Operation Sindoor : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ड्रोन हल्ल्याल भारतीय सैन्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर अखेर भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाली. त्यामुळे सध्या दोन्ही देशामधील तणाव काहीसा कमी झाल्याची परिस्थिती आहे.
भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीच्या घोषनेनंतर अद्यापही सीमावर्ती भागातील रहिवाशांना गोळीबाराची किंवा स्फोटाची भिती वाटत असल्याचं ते सांगतात. दरम्यान, भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर सीमावर्ती भागातील काही रहिवाशांना लष्कराने पाडलेले ड्रोन देखील आढळून आले होते. दरम्यान, या संदर्भात तेथील रहिवाशी मोहम्मद रफीक हे सांगतात की पूंछ जिल्ह्यातील नांगली साहिब भागात एक न फुटलेला तोफगोळा दिसला होता.
“तो गोळा पडताना आवाज झाला नाही. तो गोळा मक्याच्या ढिगाऱ्यावर पडला. एके दिवशी तो गोळा पेटलेला असताना आम्ही पाहिला. जेव्हा पोलीस चौकीला फोन केला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना व्हिडीओ पाठवण्यास सांगितलं. आम्हाला बाहेर जाण्यासाठी त्या मार्गाचा वापर करण्यासही भीती वाटते. पण तरीही त्यांनी आम्हाला व्हिडीओ बनवण्यास सांगितलं होतं. नियंत्रण रेषेवरून पूंछमध्ये डागण्यात आलेल्या आणि न फुटलेल्या शस्त्रसामग्रीच्या समस्यांमुळे अनेकांना चिंता सतावत आहे”, असं रफीक यांनी सांगितलं. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
“आता मला काळजी वाटते की एखाद्या दिवशी अचनाक स्फोट होईल. शाळा पुन्हा उघडल्यानंतर आमच्या मुलांना डोंगरावरून खाली जावे आणि पुन्हा यावे लागते. आम्ही ११ मे रोजी एक तोफगोळा पाहिला आणि दोन दिवस बाहेर पडलो नाहीत. त्यानंतर आम्हाला दिसलं की गोळ्याला आग लागली होती. कालही आम्हाला गोळ्यातून धूर निघताना दिसला. मात्र, तरीही अद्याप अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले नाहीत,” असं मोहम्मद रफीक यांनी सांगितलं.
नियंत्रण रेषेपासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या त्यांच्या घराजवळील एका ठिकाणी आणखी एक गोळा पडला आणि त्याचा स्फोट झाला. दरम्यान, काही वर्षांपूर्वी बांदिचेचियान येथील एका मुलाने न फुटलेल्या तोफ गोळ्याशी खेळल्याने त्याने दोन्ही हात गमावले होते, असंही रफीक सांगितात. तसेच पुंछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शफकत हुसेन यांनी मानकोट गावाला भेट देताना लोकांना संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचं आवाहन केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.स
दरम्यान, रफीकचा शेजारी रिझवान अहमद यांच्या कुटुंबाच्या स्वयंपाकघरात एक न फुटलेला गोलाकार गोळा पडला होता. सतत गोळीबार होत असल्याने आम्ही सर्वजण आमच्या मावशीच्या घरी होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता परत आलो तेव्हा आम्हाला छत आणि भिंतीमधून आतमध्ये एक गोलाकार गोळा घुसलेला दिसला. सुदैवाने त्याचा स्फोट झाला नाही. त्यानंतर आम्ही गावातील काही प्रमुखांना कळवलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. तीन पोलीस आणि लष्करातील अधिकाऱ्यांनी त्याला निकामी विल्लेवाट केल्याचं रिझवान अहमद यांनी सांगितलं.