Operation Sindoor Updates: संरक्षण मंत्रालयाने सर्व प्रसारमाध्यमांसाठी चार मुद्यांचे निर्देश जाहीर केले आहेत. ज्यामध्ये त्यांना निवृत्त लष्करी अधिकारी, सशस्त्र दलातील निवृत्त कर्मचाऱ्यारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय लष्कराने नुकतेच पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातू हवाई हल्ले केले होते. त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश महत्त्वाचे मानले जात आहेत.

७ मे रोजी, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून, भारतीय लष्कराने २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले होते. ज्यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचा तळ यांचा समावेश होता.

“भारतीय सशस्त्र दलाचे उपक्रम, कामगिरी आणि बलिदानांचे सातत्याने कव्हरेज करणाऱ्या प्रसारमाध्यमांचे काम कौतुकास्पद आहे. जनतेला माहिती देण्यात आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबींची अधिक चांगली समज निर्माण करण्यात माध्यमांचा सहभाग महत्त्वाची भूमिका बजावतो,” असे या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्देशांत म्हटले आहे.

“ऑपरेशन सिंदूरसारख्या चालू असलेल्या ऑपरेशन्सच्या संदर्भात, सशस्त्र दलातील ज्येष्ठ अधिकारी त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेमुळे लोकांच्या नजरेत आले आहेत. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाच्या असे लक्षात आले आहे की, हे वाढलेले लक्ष व्यावसायिक कव्हरेजच्या पलीकडे अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचले आहे”, असे संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशात म्हटले आहे.

यामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, “अशा कृती अत्यंत अयोग्य आहेत आणि अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रतिष्ठेला, गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकतात. ज्येष्ठ अधिकारी जरी प्रमुख सार्वजनिक क्षेत्रांत काम करत असले तरी, त्यांचे कुटुंब खाजगी नागरिक असून त्यांच्याशी योग्य आदर आणि संवेदनशीलतेने वागले पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसारमाध्यमांसाठी ४ मुद्यांचे निर्देश

मंगळवारी जनसंपर्क संचालनालयाने जाहीर केलेल्या या निर्देशांमध्ये संरक्षण कर्मचाऱ्यांशी संबंधित बातम्या कव्हर करताना पत्रकार आणि माध्यम संस्थांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे.

  • अधिकृत माध्यमांद्वारे आमंत्रित किंवा परवानगी मिळाल्याशिवाय, सेवेत असणाऱ्या किंवा निवृत्त सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या खाजगी निवासस्थानांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना भेट देणे किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे टाळावे.
  • लष्करी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवासी पत्ते, कुटुंबातील सदस्यांचे फोटो किंवा सार्वजनिक हिताच्या नसलेल्या इतर माहितीसह वैयक्तिक तपशीलांचे प्रकाशन किंवा प्रसारण टाळा.
  • सशस्त्र दलांच्या कामाचे आणि ऑपरेशनल पैलूंवरील कव्हरेजवर लक्ष केंद्रित करा आणि लष्करी कर्मचाऱ्यांच्या खाजगी जीवनाबद्दलचे वृत्तांकन टाळा.
  • लष्करी ऑपरेशन्स चालू असताना किंवा वाढत्या राष्ट्रीय सुरक्षेच्या काळात, गोपनीयता आणि ऑपरेशनल गोपनीयतेच्या मर्यादेचा आदर करा.