India Airstrike Operation Sindoor And India Pakistan War Tensions: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आज पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या कारवाईत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. दरम्यान भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईवर सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर भारतीय लष्कराचे कौतुकही होत आहे.
अशात आता भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये इशारा देत, ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या कारवाईची फक्त एक झलक आहे, असे म्हटले आहे.
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आपल्या तीन शब्दांच्या पोस्टमध्ये, “अभी पिक्चर बाकी है…”, असे म्हटले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या कारवाईनंतर अवघ्या काही तासांत त्यांनी ही पोस्ट केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानस्थित दहशवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारतीय लष्कराने ही कारवाई केली आहे.
ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दल आणि लष्कराचे ऑपरेशन होते. एकीकडे, आयएएफच्या लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले, तर दुसरीकडे, लष्कराने क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला. भारतीय सैन्याच्या हल्ल्यांची ताकद इतकी प्रचंड होती की पाकिस्तानी हवाई दलाला भारतीय हवाई दलाने क्षेपणास्त्रे डागल्याचे लक्षातही आले नाही.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात एका परदेशी पर्यटकासह २६ जण मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली होती. याचाच भाग म्हणून सर्वप्रथम सिंधू जल करार स्थगित करण्यात आला. याचबरोबर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा तत्काळ रद्द करण्यात आला होता.