Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे बनले होते. यादरम्यान भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये राबविलेले ऑपरेशन सिंदूर सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. दहशतवी तळांवर केलेल्या लष्करी हल्ल्यांनंतर आता भारतीय जनता पक्षाने पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हल्ल्यात मसूद अझहर कडून चालवले जाणारे दहशतवादी संघटनेचे मुख्यालय मरकज सुभान अल्लाह उद्ध्वस्त करण्यात आले आल्याचे म्हटले आहे. “बहावलपूर (पंजाब, पाकिस्तान) येथील मरकज सुभान अल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यासह दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठीचे हे एक प्रमुख केंद्र होते. बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते. जे उद्ध्वस्त करण्यात आले,” असे अमित मालवीय त्यांच्या पोस्टमध्ये व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हणाले आहेत.

भारताने बहवलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यलय आणि प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करत दहशतवादी संघटनेला मोठा झटका दिला आहे. दरम्यान मालवीय यांनी शेअर केलल्या व्हिडीओमध्ये दहशतवादी तळाला झालेले नुकसान पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दशकांच्या काळात जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांसाठी जबाबदार आहे. दरम्यान भारतीय लष्कराने हल्ला केलेले हे बहावलपूर ठिकाण पाकिस्तानच्या आतल्या भागात येते आणि ते पाकिस्तानातील १२ वे सर्वात मोठे शहर आहे. हे शहर या दहशतवादी संघटनेचे केंद्रस्थान आहे.

ऑपरेशन सिंदूर

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त जम्मू काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम पार पाडली. भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या या हल्ल्यात देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अजहरच्या कुटुंबाचा देखील खात्मा करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील १० तर निकटवर्तीय असलेल्या ४ सदस्यांचा मृत्यू झाला. या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.