India Pakistan War Tensions पहलगामचा हल्ला हा अत्यंत क्रूर होता. तिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या झाडून ठार केलं. जम्मू काश्मीरची स्थिती चांगली होत होती. ती बिघडवण्यासाठी पहलगामचा हल्ला झाला. मागच्या वर्षी सव्वा दोन कोटींहून अधिक लोकांनी काश्मीरला भेट दिली होती. पाकिस्तानने कुरापती काढण्यास सुरुवात केली. जम्मू काश्मीरमध्ये धार्मिक दंगे उसळवण्यासाठीही दहशतवादी हल्ला केला. TRF ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. ही संघटना पाकिस्तानशी संबंधित आहे.

विक्रम मिसारी यांनी काय सांगितलं?

प्रत्यक्षदर्शी आणि तपास यंत्रणांच्या मदतीने हल्लेखोरांची ओळखही पटली आहे. पहलगामचा जो हल्ला झाला तो दहशत पसरवण्यासाठीच झाला. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे आता जगाला कळलं आहे. हा देश आंतरराष्ट्रीय स्तरावर दिशाभूल करण्याचंही काम करतो. साजीद मीरला त्यांनी मृत घोषित केलं होतं. पहलगाम हल्ल्यानंतर देशाच्या मनात चिड आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही निर्देश देऊनही पाकिस्तानने या दहशतवाद्यांविरोधात कुठलीही कारवाई केली नाही. आज पहाटे भारताने आपल्या अधिकाराचा उपयोग करत पाकिस्तानला जबाबदारीने उत्तर दिलं आहे. दहशतवादाचा पाया मोडण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी ही माहिती दिली.

लष्करी अधिकारी सोफिया कुरेशींनी दिली माहिती

दहशतवादी कारवायांचा कणा मोडण्यासाठी ही मोहीम आम्ही राबवली. तसंच जी ठिकाणं आम्ही निवडली त्यात सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही, कुठल्याही निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेतली. POJK मधील पहिला सवाईनाला कॅम्प हा मुजफ्फराबाद येथील तळ उद्ध्व्सत करण्यात आला. लाईन ऑफ कंट्रोलपासून ३० किमी लांब होता. लष्कर ए तोयबाचा हा तळ होता. पहलगाम हल्ल्याचं प्रशिक्षण दहशतवाद्यांनी घेतलं होतं. ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या दोन हल्ल्यांचं प्रशिक्षणही दहशतवाद्यांनी इथून घेतलं होतं. दुसरा तळ मुजफ्फराबादमधलाच होता जो आम्ही उद्ध्वस्त केला हा जैश ए मोहम्मदचा तळ होता. हत्यारं, दहशतवादी ट्रेनिंग हे सगळं इथून चालत होतं. कोटलीतल्या फूलपूर या ठिकाणाचा तळही उद्ध्वस्त करण्यात आला. हा तळ ३० किमी अंतरावर आहे. लष्कर ए तोय्यबाचा हा तळ होता. भारतात २०२३ मध्ये झालेल्या हल्ल्याच्या दहशतवाद्यांनी या ठिकाणाहून ट्रेनिंग घेतलं होतं.

कसाब आणि हेडलीला ट्रेनिंग दिलेला तळही उद्ध्वस्त

चौथा तळ भीमबर या ठिकाणचा होता, या ठिकाणीही हत्यारं होती, ट्रेनिंग दिलं जात होतं. हा तळही भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केला. अब्बास कँप कोटली हा देखील उद्ध्वस्त करण्यात आला. हा कँप एलओसीपासून १३ किी दूर आहे. फिदायिन हल्ल्यांचं प्रशिक्षण या ठिकाणाहून दिलं जात होतं. या ठिकाणी एका वेळी १५ दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जायचं हा तळही उद्ध्वस्त करण्यात आला. पाकिस्तानच्या सियालकोट इथला सरजल हा तळ आम्ही उद्ध्वस्त केला. मार्च २०२५ मध्ये जम्मू काश्मीरच्या पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्या दहशतवाद्यांनी या तळावर प्रशिक्षण घेतलं होतं. यानंतर सियालकोटमधला मेहमुना कॅम्प उडवला. हा हिजबुलचा कँप होता. कठुआ या ठिकाणी दहशतवाद पसरवण्यासाठी या तळाचा उपयोग होत होता. पठाणकोटचा हल्ल्याचा कट याच तळावरुन रचला होता. मर्कस तायबा मुरिदके हा २५ किमी दूर असलेला तळ उद्ध्वस्त कऱण्यात आला आहे. २००८ मध्ये जो 26/11 चा हल्ला मुंबईवर करण्यात आला. त्यातल्या अजमल कसाबसह इतर दहशतवाद्यांनी या तळावर प्रशिक्षण घेतलं होतं. डेव्हिड हेडलीही या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये होता अशीही माहिती सोफिया कुरेशी यांनी दिली. मरकझ सुभानअल्लाह, भागलपूर – हा तळ आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १०० किमी लांब आहे. हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं. इथे रिक्रुटमेंट, प्रशिक्षण दिलं जात होतं. दहशतवाद्यांचे महत्त्वाचे नेते इथे येत होते. अशीही माहिती कुरेशी यांनी दिली.