Calm in Jammu, Punjab And Rajsthan : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव आता शांत झाल्यानंतर जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागातही परिस्थिती पूर्ववत झाली आहे. आज सकाळपासून या भागांमध्ये सायरनचा आवाज वाजला नसून जनजीवनही सुरळीत झाले असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले.
७ मे पासून भारत पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांकडून एकमेकांवर लष्करी कारवाया केल्या जात होत्या. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान मोठा संघर्ष सुरू होता. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांनी काही अटींवर शस्त्रविराम घेतला आहे. शस्त्रविरामानंतरही पाकिस्तानने जम्मूतील काही भागात हल्ले केल्याचे वृत्त होते. शनिवारी रात्री रहिवाशांनी स्वेच्छेने रात्रभर ब्लॅकआऊट पुकारला होता. पण आज सर्व सीमावर्ती भागात शांतता आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये काय स्थिती?
नियंत्रण रेषेवरील गावांतील लोक सुरक्षेच्या कारणास्तव इतरस्त्र स्थायिक झाले होते. पण आता परिस्थिती पूर्ववत झाल्याने ते आपल्या घरी परतत आहे. यातील काही लोकांचे सीमेपलीकडून झालेल्या तोफखान्याच्या गोळीबारात नुकसान झालं आहे. “आम्ही काल रात्रीच आमच्या गावात परतलो”, उरीमधील गारकोट येथील रहिवासी मुश्ताक अहमद यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले . “तीव्र गोळीबारानंतर आम्ही गुरुवारी येथून निघालो होतो. काल रात्रीपासून शांतता आहे”, असं ते म्हणाले.
बारामुल्लामधील उरी सेक्टरपासून कुपवाडामधील नोगम आणि तंगधार आणि बांदीपोरातील गुरेझपर्यंत भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याने गोळीबार रोखल्याने सीमा शांत होत्या. “काल रात्री दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला नाही”, गुरेझमधील एका रहिवाशाने सांगितले. “युद्धविरामानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे आणि जे इतर ठिकाणी गेले होते ते परत येत आहेत”, असं येथील नागरिकांनी म्हटलंय.
तंगधार येथील एका रहिवाशाने इंडियन एक्सप्रेसला फोनवरून सांगितले की, शनिवारी रात्री सीमावर्ती भागात युद्धबंदीचे उल्लंघन झाले नाही आणि लोक चार दिवसांत पहिल्यांदाच त्यांच्या घरात झोपले. “शस्त्रविराम कायम राहणार नाही अशी भीती होती. परिणामी, अनेक गावकऱ्यांनी (सामुदायिक) बंकरमध्ये रात्र घालवणे पसंत केले”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी शस्त्रविरामाची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच खोऱ्यात स्फोटांचे आवाज ऐकू आले होते. पण त्यानंतर श्रीनगरमध्येही सामान्य परिस्थिती परतल्याचे दिसून आले. शनिवारी संध्याकाळी झालेल्या सुरुवातीच्या गोंधळ आणि अंधारानंतर, उर्वरित रात्रीसाठी रस्त्यावरील दिवे चालू ठेवण्यात आले आणि तसंच तीन दिवसांत पहिल्यांदाच सायरन आणि स्फोटांचा आवाज आला नाही. गेल्या आठवड्यात सीमावर्ती भागात झालेल्या तोफखान्याच्या गोळीबारात १५ हून अधिक लोक ठार झाले आणि सुमारे १०० घरे आणि सरकारी इमारतींचे नुकसान झाले.
पंजाबमध्येही शांतता परतली
पंजाबमधीलही कालची रात्र तुलनेने शांत होती. रविवारी सकाळी अमृतसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असला तरी, तो अखेर मागे घेण्यात आला. पठाणकोट आणि अमृतसरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले असले तरी, येथील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की ही भारतीय सैन्याने विल्हेवाट लावलेली स्फोटके नव्हती आणि काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. सकाळपर्यंत, सीमावर्ती राज्याच्या जवळजवळ सर्व भागात वीजपुरवठा पूर्ववत झाला होता. फिरोजपूर, जालंधर आणि होशियारपूरमध्ये शांतता होती. संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते , जिथे रहिवाशांनी आदल्या रात्री स्वेच्छेने त्यांचे दिवे बंद ठेवले होते.
राजस्थानमध्ये परिस्थिती पूर्ववत
राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती होती. येथील रेड अलर्टही हटवण्यात आला आहे. आदल्या रात्री, काही ड्रोन दिसल्यानंतर सीमावर्ती जिल्ह्यात सायरन वाजले, पोलिसांनी परिसरात फिरून रहिवाशांना त्यांची दुकाने बंद करण्यास आणि ब्लॅकआउटच्या आदेशांचे पालन करण्यास सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तरलाई हवाई तळाकडे जाणारे ड्रोन अखेर पाडण्यात आले. परंतु, रात्री ११.३० नंतर सायरन वाजणे बंद झाले. पोलीस आणि जिल्हा प्रशासन रात्रभर सतर्क राहिले, शेजारच्या जैसलमेर जिल्ह्यात ड्रोन हल्ल्याची शक्यता असल्याने पोलिसांना भीती होती. पण तेथील परिस्थितीही आता शांत आहे.