आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्यात आला आहे. त्यावरुन विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रश्नोत्तराचा तास स्थगित करुन सरकार लोकशाहीचा गळ घोटण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप काँग्रेसने केला आहे.

करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश पक्षांनी प्रश्नोत्तरांच्या तासाशिवाय कामकाज करण्यास सहमती दिली, असे सरकारकडून सांगण्यात आले.

“प्रश्नोत्तराचा तास नसला तरी चालेल, यावर बहुतांश पक्षाचे नेते तयार झाले. असाधारण परिस्थितीत हे अधिवेशन होत आहे, त्यामुळे सभागृहाच्या सर्व सदस्यांना मी सहकार्य करण्याचे आवाहन करतो” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

आणखी वाचा- जगाच्या तुलनेत भारतात करोना संसर्गाचा वेग मंदावला- डॉ. हर्षवर्धन

“प्रश्नोत्तराचा तास हा खूप महत्त्वाचा आहे. पण तुम्ही परिस्थितीमुळे हा तास होणार नाही असे सांगत आहात. प्रश्नोत्तराचा तास बाजूला काढून तुम्ही सभागृहाचे कामकाज करत आहात. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करताय” असे काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले. या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याच्या निर्णयाचे भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी सुद्धा समर्थन केले. सरकार चर्चेपासून पळत नाहीय, असे ते म्हणाले.