डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांनिमित्त हिवाळी अधिवेशनातील दोनदिवसीय राज्यघटनेवरील चर्चेच्या समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या समानतेच्या विचारांवर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनीच पाणी फेरले. गुजरातमधील द्वारका मंदिरात जात विचारल्याचे अनुभवकथन करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा ‘निर्मित भेदभावा’चा प्रसंग सांगत असल्याचे धक्कादायक विधान गोयल यांनी केले. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस खासदारांनी गोयल यांच्या माफीनाम्याची मागणी केली.
राज्यघटनेवर चर्चा करताना शैलजा यांनी केंद्रात मंत्री असताना गुजरातच्या द्वारका मंदिरात आलेला अनुभव ३० नोव्हेंबर रोजी सभागृहात सांगितला होता. या मंदिरात आपल्याला जात विचारण्यात आली होती, असा गौप्यस्फोट शैलजा यांनी केला होता. ही चर्चा तेथेच संपली होती. मात्र बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शैलजा यांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी द्वारकाधीश मंदिराच्या अभ्यागत पुस्तिकेत दि. २३ फेब्रुवारी २०१३ रोजी कुमारी शैलजा यांच्या हस्ताक्षरातील अभिप्राय सभागृहात वाचून दाखविला. शैलजा यांनी त्यात द्वारकाधीश मंदिराच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले होते.
जेटलींनी सादर केलेल्या पुस्तिकेतील प्रतिक्रियेवर शैलजा यांनी आक्षेप घेत द्वारकाधीश नव्हे तर द्वारका मंदिरात जात विचारण्याचा अनुभव आल्याचे स्पष्टीकरण दिले. जेटली सांगत असलेले मंदिर ते नसून जात विचारली गेली ते मंदिर एका बेटावर असल्याचा खुलासा शैलजा यांनी केला. संतप्त शैलजा यांनी जेटलींवर सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. जेटलींनी माफी मागावी अथवा आपले शब्द मागे घेण्याची मागणी त्यांच्यासह सर्वच काँग्रेस खासदारांनी केली. ही आग शमण्याची चिन्हे असताना गोयल यांनी त्यात जणू तेल ओतले.