राज्यसभेत गोरक्षकांवरून विरोधकांची टीका; धार्मिक रंग न देण्याचे सत्ताधाऱ्यांचे आवाहन 

स्वयंघोषित गोरक्षकांचा धुडगूस आणि देशभरात हिंसक जमावाकडून झालेल्या हत्यांच्या घटनांवरून एकत्रित विरोधी पक्षांनी बुधवारी मोदी सरकारला धारेवर धरले. या घटनांमध्ये संघपरिवारातील व सत्तारूढ भाजपची मंडळी सहभागी असल्याचा थेट आरोपही विरोधकांनी केला. या घटनांना धार्मिक रंग न देण्याचे सरकारचे आवाहन विरोधकांनी नाकारले.

चर्चेची सुरुवात करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘‘जमावाकडून हत्या होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पण सध्या होणाऱ्या घटनांमध्ये सत्तारूढ भाजपचा व संघपरिवाराचा हात आहे. ते गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हाती घेत आहेत आणि दुर्दैवाने रोखण्याऐवजी सरकारने त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यांना हवे ते करण्याची मुक्त मुभा दिलीय. हे सरकार फक्त बोलघेवडे आहे. मग गोरक्षकांना चाप कसा बसेल? हा काही हिंदूविरुद्ध मुसममान किंवा उच्चवर्णीयाविरुद्ध दलित असा मुददा नाही. हा देशासाठी लढा आहे. मानवतेसाठी संघर्ष आहे. देशासाठी जीव देण्याची आमची तयारी आहे. कृपा करून मतांसाठी देशाचे विभाजन करू नका.’’

आझादांच्या या धारदार टीकेने सत्तारूढ पक्ष  खवळला. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वींनी आरोप फेटाळले. ‘‘कायदा हातात घेणारे खरे गोरक्षक नाहीत. सरकार गप्प नाही. असले प्रकार खपवून घेणार नसल्याची आमची भूमिका स्पष्ट आहे.

नरेश आगरवालांची दिलगिरी

या चर्चेमध्ये समाजवादी पक्षाचे नरेश आगरवाल यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने सभागृहात  भडका उडाला. भाजपचे सदस्य गोंधळ घालून माफीची मागणी करू लागले.

उपसभापती प्रा. पी. जे. कुरियन यांनीही आगरवालांना कोणाच्याही धार्मिक भावनांना धक्का न लावण्याबद्दल तंबी दिली. शेवटी आपले विधान मागे घेत असल्याचे आगरवालांनी सांगितले आणि विषय संपला. मग उपसभापतींनी त्यांचे विधान कामकाजातून वगळले.

धारदार हल्ले..

शांततेचे प्रतीक असलेली गाय आता दहशतवादाचे प्रतीक बनली जात आहे.. किती दुर्दैवी प्रकार आहे हा. जमावाने कायदा हातात घेऊन एखाद्याची हत्या करण्याचा प्रकार दहशतवादासारखाच आहे. तो काही किरकोळ गुन्हा नाही. सत्तारूढ पक्षाने या घटना अतिशय गांभीर्याने घेतल्या पाहिजेत..   माजिद मेमन, राष्ट्रवादीचे नेते

भाजपला विरोधकांचे ऐकायचे नसेल तर ऐकू नका.. पण जग काय म्हणते, ‘जी-२०’ देशांचा समूह काय म्हणतोय, अमेरिका काय म्हणतेय, आंतरराष्ट्रीय माध्यमे काय म्हणताहेत.. ते तरी समजून घ्या. भारताला हिंदूराष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करणे सोडून द्या..   सीताराम येचुरी, माकप, सरचिटणीस

पोकळ शब्दांचा काही उपयोग नाही. सरधोपटपणे बोलण्यात अर्थ नाही. गोरक्षकांची नावे घ्या, त्यांचे लागेबांधे लपवू नका. हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत.   डेरेक ओब्रायन, तृणमूल काँग्रेस</strong>