श्रीनगर : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रे व त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा अनेक विरोधी पक्षनेत्यांनी केले. ‘राहुल यांच्या नेतृत्वात ‘आशेचा किरण’ दिसत असल्याचे भारत जोडो यात्रेच्या समारोपप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत सहभागी अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक, इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी) आदी पक्षांचे नेते या सभेत सहभागी झाले होते. बहुजन समाज पक्षाचे खासदार श्यामसिंह यादव हे देखील सहभागी झाले होते. ते राहुल गांधींसोबत दिल्लीत पदयात्रेत सहभागीही झाले होते.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी राहुल यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, की महात्मा गांधीजी म्हणाले होते की, मला जम्मू-काश्मीरमधून आशेचा किरण दिसतो आहे. आज संपूर्ण देशाला राहुल गांधींकडून आशेचा किरण दिसत आहे.
‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले, की देशाला अशा पदयात्रेची खूप गरज होती. या देशात एकच सर्वसमावेशकतेचा विचार आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे करण्यात आला आहे.
द्रमुक नेते तिरुची सिवा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या वतीने राहुल यांचे अभिनंदन केले.
भारताचा पूर्व-पश्चिम मेळ साधावा- ओमर
ओमर अब्दुल्ला म्हणाले, की एका बाजूला संघ परिवाराचे लोक व त्यांचा विचार आहे. दुसरीकडे, देशात असे लोक आहेत ज्यांना वेगळी विचारसरणी हवी आहे. ज्यांना परस्परांसह शांतता व प्रेमाने राहायचे आहे. ही विचारसरणी भाजप देऊ शकत नाही. राहुल यांच्या या भेटीमुळे भारतात आशेचा किरण जागा झाला आहे. राहुल गांधींना उद्देशून ते म्हणाले, की तुमच्या या भेटीमुळे दक्षिण भारत उत्तर भारताशी जोडला गेला आहे. आता पश्चिम भारताला पूर्व भारताशी जोडण्याची वेळ आली आहे.