रविवारी झालेल्या आयसीसी टी -20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. हा सामना संपल्यानंतर पंजाबमधील दोन विद्यालयांमध्ये अनेक काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचं समोर आलंय. पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील भाई गुरदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सामन्यानंतर त्यांच्या वसतिगृहात काश्मिरी विद्यार्थ्यांवर केलेल्या या हल्ल्याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. तर, खरारमधील रयत बहराट विद्यापीठातही असाच प्रकार घडला आहे.

“संगरूर आणि खरार मोहालीमध्ये ज्या काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ला झाला त्यांना स्थानिकांनी आणि इतर पंजाबी विद्यार्थ्यांनी वाचवले. बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील विद्यार्थी त्यांच्या खोल्यांमध्ये घुसले, त्यांना मारहाण केली,” असा दावा जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीर खुहेमी यांनी दावा केला.

संगरूर महाविद्यालयातील एका व्हिडीओमध्ये एका विद्यार्थ्याने सुरक्षा रक्षकावर आरोप केला आहे. त्याने म्हटलंय की, सुरक्षा रक्षकाने यूपीतील विद्यार्थ्यांच्या एका गटाला त्यांच्या खोल्यांमध्ये घुसू देत त्यांना मारहाण करू दिली. प्रकरणाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब पोलीस महाविद्यालयात पोहोचले आणि त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांशी बातचीत केली.

“भारत-पाकिस्तान सामन्यानंतर खरार मोहालीमध्ये चार काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. सर्व विद्यार्थी रयत बहरत विद्यापीठातील आहेत. त्यांना हरियाणातील विद्यार्थांनी मारहाण केली. पंजाब पोलिसांनी पंजाबमध्ये शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांचे रक्षण करायला पाहिजे. भाई गुरदास महाविद्यालयात मी अनेकांशी बोललो आहे. त्या विद्यार्थांना बिहारमधील विद्यार्थ्यांनी मारहाण केली, खोल्यांची तोडफोड केली, हॉलचे नुकसान केले आणि काहींना शिवीगाळ केली,” असं खुहेमी म्हणाले.