पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोरील आव्हाने कमी होण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या अहवालानुसार महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्य़ांच्या संख्येचा विचार करता देशात बंगाल आघाडीवर आहे तर दुसरीकडे, कामधुनी गावातील महाविद्यालयीन युवतीवर झालेल्या बलात्कारानंतर, ममतांनी बलात्कार प्रकरण हे आपल्याविरोधात कम्युनिस्टांनी रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप केला असून त्याविरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले आहे. आता ‘सिव्हिल सोसायटी’ आणि बुद्धिजीवी वर्गही ममतांपासून दुरावल्याची चिन्हे आहेत.
कामधुनी येथील तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात प्रसारमाध्यमांनी ममतांना चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे ममता दिदी दुखावल्या असून त्यांचा संयमही सुटताना दिसत आहे. रविवारी सरकारचा बचाव करताना ममता यांनी ‘बंगालमधील सर्व स्त्रियांवर तर बलात्कार झालेला नाही, ना!’ असे उद्गार काढले होते. शिवाय, ‘पत्रकारांनी आपल्यावर अशी काही टीका केली की जणू काही मीच कामधुनी येथे बलात्कार केला असावा’, अशी विधाने ममतांनी केली. या बलात्कारामागे कम्युनिस्ट नेत्यांचे षडयंत्र असून हा आपल्याला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील महिलांची परिस्थिती अधिक सुरक्षित करण्याऐवजी ममता राजकीय विधाने करीत असल्यामुळे बंगालमधील नागरी समाज आणि बुद्धिजीवी वर्ग त्यांच्यापासून दुरावला आहे. प्राध्यापक, चित्रपट निर्माते यांनी आपण ज्या ममता दिदींना निवडून दिले त्या या नव्हेतच असा दावा केला आहे.
आरोप करण्यापेक्षा आपल्या  वचनानुसार अशा प्रकरणांचा जलदगतीने निकाल लावणे, गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे आदी बाबींकडे ममतांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.