Rs 49,000 crore Ponzi Scheme Case: भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणुकींपैकी एक असेलल्या पर्ल्स ॲग्रो-टेक कॉर्पोरेशन लिमिटेड या पॉन्झी स्किम प्रकरणात कंपनीचा संचालक गुरनाम सिंग (वय ६९) याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या आर्थिक गुन्हे शाखेने पंजाबच्या रोपार जिल्ह्यातून गुरनाम सिंगला अटक केली. पॉन्झी स्किमच्या माध्यमातून उत्तर प्रदेश, आसाम, पंजाब, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार आणि छत्तीसगड अशा १० राज्यांमधील पाच कोटी गुंतवणूकदारांकडून तब्बल ४९ हजार कोटी रुपयांची रक्कम बेकायदेशीरपणे गोळा करत घोटाळा केल्याबद्दल सदर अटक करण्यात आली.

पीएसीएल प्रकरणात सीबीआय आणि ईडी यांनी संयुक्तपणे खटला दाखल केला होता. तक्रार आणि सेबीच्या चौकशीनंतर कानपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेत याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दहा आरोपींपैकी गुरनाम सिंग एक आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात चार जण आधीच अटकेत आहेत. पाच आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने सांगितल्यानुसार, पीएसीएल कंपनीची स्थापना निर्मल सिंग भांगो यांनी केली होती. त्यांचा कालांतराने मृत्यू झाला. त्यानंतर गुरनाम सिंग हा कंपनीचा महत्त्वाचा संचालक होता. कंपनीच्या कागदपत्रांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील ५० लाख सामान्य गुंतवणूकदारांची या पॉन्झी स्किमद्वारे फसवणूक झाली असल्याचेही आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले.

पॉन्झी स्किम कशी काम करत होती?

आर्थिक गुन्हे शाखेच्या महासंचालक नीरा रावत यांनी सांगितल्यानुसार, पिरॅमिड योजनेप्रमाणे या स्किमचे काम सुरू होते. आधीच्या गुंतवणूकदारांना नव्या गुंतवणूकदारांकडून आलेला निधी नफा म्हणून वितरीत केला जात होता. स्किममधील एजंट्सना अधिकाधिक गुंतवणूकदार आणण्यासाठी मोठे कमिशन दिले जात होते. तसेच कुटुंब आणि मित्रांना योजनेत जोडण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. यासाठी सेमिनार आयोजित करून गुंतवणूकदारांना आकर्षित केले जात असे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएसीएल कंनपीचा इतिहास

जयपूरमध्ये १९६६ साली गुरवंत ॲग्रो-टेक लिमिटेड या नावाने स्थापन झालेल्या कंपनीचे नामकरण २०११ साली पीएसीएल असे करण्यात आले होते. नवी दिल्लीत कंपनीचे मुख्यालय आहे. उत्तर प्रदेशमध्ये या कंपनीचे शेकडो कार्यालये आहेत. जमिनीत गुंतवणूक करण्याची जाहिरात करून या कंपनीने मोठी गुंतवणूक करण्यास लोकांना भाग पाडले. गुंतवणूकदारांना पैसे गुंतवल्यानंतर पावत्या देण्यात आल्या. पण त्यांना बदल्यात नफा किंवा जमीन मिळाली नाही.