इस्लामाबाद, वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देईल या भीतीने पाकिस्तानमध्ये चलबिचल सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मदरसे दहा दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच सीमेलगत सैन्याची जमवाजमव सुरु आहे. नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानच्या कुरापती सुरु असून, शस्त्रसंधीचे सलग सातव्या दिवशी उल्लंघ करत गोळीबार केला. मात्र भारतीय सैन्याने त्याला चोख उत्तर दिले.
हल्ल्याच्या धास्तीने पाकिस्तानने राजस्थान सीमेलगत कुमक वाढवली आहे. तसेच सुरक्षा कारणास्तव मे महिन्यात कराची आणि लाहोर येथील हवाई हद्द रोज ठराविक काळासाठी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच वाढता तणाव पाहता पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली.
मदरसे बंद
भारत हल्ला करेल या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व मदरसे दहा दिवसांसाठी बंद करण्यात आलेत. धार्मिक विभागाचे संचालक हफीज नझीर यांनी भारतीय सैन्य मदरशांना लक्ष्य करेल ही भीती असल्याचे नमूद केले. बंदबाबत जी अधिकृत नोटीस देण्यात आली त्यात मात्र उष्णतेची लाट हे कारण देण्यात आले आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये ४४५ नोंदणीकृत मदरसे असून त्यात २६ हजार विद्यार्थी आहेत.
कुरापती सुरुच
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. एप्रिल ३० व १ मे रोजी उरी आणि अखनूरमध्ये क्षेत्रात गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले. सलग सातव्या दिवशी भारताने पाकिस्तानने गोळीबार केला. नौशेर, सुंदरबनी येथेही आगळीक करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारताने सडेतोड उत्तर दिले.
अटारीवाघा सीमा बंद
अटारी-वाघा सीमा पूर्णपणे बंद करण्यात आली. केंद्राने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. बुधवारी या सीमेवरून १२५ पाकिस्तानी नागरिक परतले. गेल्या सात दिवसांत ९११ पाकिस्तानी नागरिक भारतातून गेले. तर पाकिस्तानी व्हीसा असलेले १५ भारतीय नागरिक मायदेशी आले.
संरक्षण दलामध्ये व्यापक फेरबदल
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण दलात उच्च स्तरावर व्यापक फेरबदल करण्यात आले आहेत. लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर इन कमांडिंग इन चीफ, मेजर जनरल लिस्म्मा पी.व्ही यांची मिलिटनरी नर्सिंग सर्व्हिस (मनसे)च्या अतिरिक्त महासंचालकपदी, तर एअर मार्शल आशुतोष दीक्षित ‘सीआयएससी’ प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.