Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीर येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा तपासा राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) केला जात आहे. दरम्यान एनआयएच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबतच्या प्राथमिक अहवालात पाकिस्तानी गुप्तचर संस्था, इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (एलईटी) यांच्या संबंधांबद्दल माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

एनआयए सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जणांचा जीव घेणार्‍या दहशतवादी हल्ल्याची कट हा लष्कर-ए-तैयबा अंतर्गत रचण्यात आला, ज्यासाठी कथितरित्या आयएसआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी निर्देश दिले होते. तसेच हा कट लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानमधील मुख्यालयात रचण्यात आला असल्याचे मानले जाते.

या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांचा प्रामुख्याने हात होता, हाश्मी मुसा (उर्फ सुलेमान) आणि अली भाई (उर्फ तल्हा भाई), हे दोघे पाकिस्तानी नागरिक असल्याचे उघड झाले आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या ऑपरेटी्व्हजच्या चौकशीत दोन्ही दहशतवादी हे पाकिस्तानातील हँडलर्सशी सतत संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच त्यांना हल्ल्याची वेळ, लॉजिस्टीक आणि अंमलबजावणी याबाबत सातत्याने सूचना दिल्या जात होत्या.

उघड झालेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी भारतीय हद्दीत घुसले होते आणि त्यांना ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) यांच्या नेटवर्ककडून मदत करण्यात आली. ज्यामध्ये स्थानिक लॉजिस्टिक सपोर्ट ज्यामध्ये राहाण्याची जागा, रस्त्यांबद्दल माहिती आणि हल्ल्याआधी संबंधित ठिकाणांची टेहळणी करण्यासाठी मदत देण्यात आली.

एनआयएने मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक आणि इलेक्ट्रॉनिक डेटा गोळा केला आहे. हल्ला झाला त्या ठिकाणाहून ४० कार्टेजेस ताब्यात घेण्यात आली आहेत आणि ती बॅलेस्टीक आणि केमिकल विश्लेषणासाठी पाठवण्यात आली आहेत. चौकशीत हल्ला झालेल्या ठिकाणाचे ३डी मॅपिंग देखील करण्यात आले आहे. याबरोबरच खोऱ्यातील जवळपासच्या मोबाईल टॉवरचा डम्प डेटा देखील मिळवण्यात आला आहे.

हल्ल्याच्या काही दिवसापर्यंत या भागात सॅटेलाइट फोनच्या हालचाली वाढल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच बैसरन आणि त्याच्या आसपास किमान तीन सॅटेलाइट फोन कार्यरत होते आणि त्यापैकी दोनचे सिग्नल ट्रेस करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.

हजारो लोकांची चौकशी

सुरक्षा यंत्रणा आणि एनआयएकडून एकूण २,८०० लोकांची चौकशी करण्यात आली आहे. २ मे पर्यंत १५० हून अधिक जण पुढील चौकशीसाठी कोठडीत आहेत. यामध्ये संशयीत ओजीडब्लू आणि बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामी यासारख्या संघटनांशी संबंधित असलेल्यांचा समावेश आहे

अनेक जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आळी आहे, ज्यामध्ये कुपवाडा, पुलवामा, सोपोरे, अनंतनाग आणि बारामु्ल्लाचा समावेश आहे. तसेच मुश्ताक अहमत झारगर उर्फ लाट्रम याच्या घरावर देखील छापा टाकण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशतवाद्यांच्या हलचालींचा मागोवा घेण्यासाठी पहलगामच्या आसपासच्या प्रमुख वाहतूक आणि सार्वजनिक ठिकाणांवरीर सीसीटीव्ही फुटेज एनआयएने ताब्यात घेतले आहे. लगतच्या सुरक्षा चौक्यांवरील डेटाचे देखील पॅटर्न मॅपिंगसाठी विश्लेषण केले जात आहे. पीडीतांचे कुटुंबिय, पोनी ऑपरेटर्स, अन्नपदार्थ विक्रेते याचा समावेश असलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून हल्ल्याची टाईमलाईन तयार केली जात आहे.