Ajit Doval On Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक मोठे निर्णय घेतले होते. तसेच ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले करत अनेक दहशतवाद्यांच्या खात्मा केला होता.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केल्याचं स्पष्टीकरण देत कोणत्याही नागरी वस्तींवर हल्ला केला नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताने भारताचं एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात होता. मात्र, हा दावा भारताने फेटाळून लावला. या पार्श्वभूमीवर बोलताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विदेशी मीडियाला आव्हान करत पाकिस्तानने भारताचे नुकसान केल्याचं एक व्हिज्युअल दाखवा असं म्हटलं आहे.

अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत पुन्हा एकदा सविस्तर माहिती सांगितली. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांना अचूकपणे लक्ष्य केलं. या कारवाईसाठी भारताला फक्त २३ मिनिटे लागले असंही डोवाल यांनी शुक्रवारी सांगितलं. आयआयटी मद्रासच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

अजित डोवाल काय म्हणाले?

“आपल्याला आपलं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करावं लागेल. सिंदूरचा उल्लेख करत तिथे किती स्वदेशी सामग्री होती याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. आम्ही पाकिस्तानच्या सीमेवर ९ दहशतवादी तळांना टार्गेट करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही एकही लक्ष्य चुकवलं नाही. आम्ही त्याशिवाय इतर कुठेही लक्ष्य केलं नाही. आमचं टार्गेट इतकं अचूक होतं की आम्हाला माहित होतं की कोण कुठे आहे? संपूर्ण ऑपरेशनला २३ मिनिटे लागले”, असं अजित डोवाल यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या लष्करी प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरवरील वृत्तांकनासाठी अजित डोवाल यांनी परदेशी माध्यमांवर टीका केली. तसेच त्यांना भारतातील पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही विध्वंसाचं दृश्य दाखवण्याचं आव्हान त्यांनी केलं. ते म्हणाले की, “परदेशी माध्यमांनी म्हटलं की पाकिस्तानने हे केलं आणि ते केलं. पण मी सांगतो की तुम्ही मला एक चित्र दाखवा, ज्यामध्ये कोणत्याही भारतीय गोष्टीचं नुकसान झालं”, असं अजित डोवाल यांनी म्हटलं आहे.