Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मागील सहा वर्षांतला काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. पर्यटकांना नाव आणि धर्म आणि विचारुन ठार करण्यात आलं. या हल्ल्याबाबत आता नवी माहिती समोर येते आहे. दहशतवादी काश्मीरमध्ये आधीच आले होते आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १९ एप्रिलच्या कटरा दौऱ्यावर हल्ला करायचा होता असंही समजतं आहे.
लष्कर ए तैय्यबाचे दहशतवादी मोदींच्या दौऱ्यावर हल्ला करणार होते?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात सहभागी असलेले चार दहशतवादी हे पाकिस्तानातील लष्कर ए तैयब्बाचे आहेत. मात्र या हल्ल्याची जबाबदारी टीआरएसने घेतली आहे. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार टीआरएस हा लष्कर ए तैय्यबाचा मुखवटा आहे. याचा वापर करुन पाकिस्तानकडून हल्ले केले जातात. तसंच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी आधीच आले होते. त्यांची मूळ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १९ एप्रिलच्या कटरा येथील दौऱ्यावर हल्ला करण्याची होती. मात्र हा कट नंतर रद्द कऱण्यात आला. द प्रिंटने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चारही दहशतवादी काश्मीरच्या बैसरन या ठिकाणी आले होते. काश्मीरच्या बैसरन या ठिकाणी मॅगी पॉईंट आहे, त्या ठिकाणी हे चौघे दाखल झाले होते. या दहशतवाद्यांकडे एके ४७ रायफल्स आणि बॉडी कॅमेरे होते असंही कळतं आहे.
दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं
द प्रिंटने दिलेल्या बातमीनुसार २२ एप्रिल रोजी जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा त्यांनी पर्यटकांमधल्या पुरुषांना लक्ष्य केलं. पुरुषांवर गोळीबार करुन त्यांना ठार केलं. १० ते २० मिनिटं दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत होते. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी विशेष तपास मोहीम राबवण्यात येते आहे. विशेष दलांनाही यासाठी पाचारण करण्यात आलं आहे. २६ लोक या हल्ल्यात मारले गेले आहेत. ज्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज पहलगाम दौऱ्यावर पोहचले आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा रद्द केला आणि ते भारतात परतले आहेत.
भारत दहशतवादापुढे झुकणार नाही-अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाममध्ये पोहचले आहेत. त्यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. भारत दहशतवादापुढे मुळीच झुकणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं. ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला, त्यांच्यापैकी एकालाही आम्ही सोडणार नाही असंही अमित शाह म्हणाले. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना झालेलं दुःख हे शब्दांत मांडता येणार नाही, मी शब्द देतो ज्यांनी निष्पाप जीव घेतले त्यांच्यापैकी एकालाही आम्ही सोडणार नाही असंही अमित शाह म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी या घटनेत ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिवांजवळ जाऊन आदरांजली वाहिली.