पेडन्यूजप्रकरणी दोषी ठरविलेल्या कोणत्याही सदस्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये केली. लोकसभेत शून्यकाळात सोमय्या यांनी पेडन्यूजचा मुद्दा उपस्थित केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पेडन्यूजप्रकरणी नोटीस बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी हा मुद्दा उपस्थित करीत चव्हाण यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, पेडन्यूजप्रकरणी निवडणूक आयोगाने एका निर्वाचित सदस्याला नोटीस बजावली आहे. काही उमेदवारांनी पेडन्यूज आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे. ज्यांनी अशा पद्धतीने पैसा उधळला असेल, त्यांना तातडीने निलंबित केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मागील विधानसभा निवडणुकीत प्रचारखर्च न दाखविल्यामुळे निवडणूक आयोगाने चव्हाण यांना नोटीस बजावली असून, तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ, याचाही खुलासा त्यांच्याकडे मागण्यात आला आहे.