पाकिस्तानातील राजकारण नेहमीच हिंसाचारग्रस्त राहिले आहे. तरीही ११ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे देशाच्या ६६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच लोकनियुक्त सरकार सत्तेवर असताना लोकशाही पद्धतीने सत्तांतर होत आहे. आतापर्यंत देशाने तीन लष्करी उठाव अनुभवले. निम्मा काळ लष्करी सत्ताधाऱ्यांनीच  देशावर राज्य केले. त्यामुळे देशात राजकीय व्यवस्था आकारास आलीच नाही. गेली पाच वर्षे मात्र निवडणुकीद्वारे सत्तेवर आलेले सरकार तकलादू स्थितीत का होईना टिकून राहिले. अस्थिरतेचा जणू  शाप असलेल्या या देशातील हा चमत्कारच म्हणावा लागेल. आता शनिवारी जनमताच्या कौलाने नवे सत्ताधारी ठरतील. हिंसाचाराच्या सावटाखाली ही निवडणूक होत आहे. प्रचारादरम्यान शंभरपेक्षा अधिक जणांचे बळी गेले आहेत.

चर्चेत असलेले नेते
*  गेली ३० वर्षे राजकारणात असलेले मुरब्बी नेते नवाझ शरीफ सत्तेकडे
वाटचाल करतील, अशी शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तवली आहे. पंजाब या लोकसंख्येच्या दृष्टीने  सर्वात मोठय़ा राज्यात त्यांच्या पक्षाचा प्रभाव असून, २००८ मध्ये त्यांच्या पक्षाने ९२ जागा जिंकल्या होत्या.
लष्कराचा वरचष्मा पुन्हा प्रस्थापित होऊ नये म्हणून त्यांनी झरदारी सरकारची पाच वर्षे
पूर्ण होऊ देण्याचा मुत्सद्दीपणा दाखवला. सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
* अध्यक्ष असिफ अली झरदारी हे मुलगा बिलावल याच्या मदतीने आपल्या पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्नशील. गेल्या निवडणुकीत त्यांना पत्नी बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ मिळाला होता. या वेळची स्थिती मात्र बिकट. हिंसाचार, महागाई, भारनियमन यामुळे लोक नाराज.
* इम्रानखान यांच्या पाकिस्तान तेहरिक इ इन्साफ या पक्षाने गेल्या वेळी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे या पक्षाची मूठ झाकलेली राहिली. या वेळेस इम्रानखान यांच्या पक्षाचा जोर. त्यांच्या सभांना मोठी गर्दी. त्यांना तरुण आणि मध्यमवर्गाचा पाठिंबा अपेक्षित. त्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबत उत्सुकता.
* पाकिस्तानातील आणखी एक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे नऊ वर्षे लष्करी हुकूमशहा राहिलेले परवेझ मुशर्रफ. मात्र, न्यायालयीन निकालांमुळे त्यांची आणि त्यांच्या पक्षाची कोंडी.  ७५ लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना मिळत असलेल्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली. यातून लष्कराच्या अस्वस्थतेची चुणूक.

मुख्य लढत कोणात ?
*  अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी
* माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग
* एकेकाळचे क्रिकेटपटू इम्रान खान याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरिक इ इन्साफ

निवडणुकीतील मुख्य मुद्दे कोणते ?
*  कोणत्याही एकाच प्रश्नाचा प्रभाव नाही.
*  तरुणांची बहुसंख्या निर्णायक ठरु शकते. ४७ टक्के लोकसंख्या
३५ वर्षांखालील वयोगटातील.
*  वीजटंचाई हा सर्व विरोधी पक्षांनी भर दिलेला प्रमुख मुद्दा १४ ते १६ तास भारनियमनाने सर्वसामान्य त्रस्त. इनव्हर्टरचा व्यवसाय तेजीत.
* कट्टर इस्लामी गटांकडून अमेरिकेच्या द्रोण हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित
* तालिबानी दहशतवाद्यांच्या निवडणूक प्रक्रिया उधळण्याच्या इशाऱ्याची चर्चा

दृष्टिक्षेपात निवडणूक
*  ८ कोटी ६१ लाख ८९ हजार ८०२ नोंदणीकृत मतदार –
*  नॅशनल असेंब्लीच्या २७२ जागांसाठी ५००० उमेदवार रिंगणात
* प्रांतिक विधानसभांसाठी ११,६९२ उमेदवार
* निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ६ लाख सुरक्षा सैनिक सज्ज
* ७३ हजार मतदान केंद्रांवर मतदान. २० हजार मतदान केंद्रे सुरक्षेसाठी  संवेदनशील.

भारताशी उत्तम संबंध ठेवण्याचा जाहीरनामा
इस्लामाबाद : पाकिस्तानातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात भारताशी उत्तम संबंध ठेवण्याबरोबरच चर्चेद्वारे काश्मीरचा प्रश्न सोडविण्याचे आणि आर्थिक संबंध दृढ करण्याचे अभिवचन मतदारांना दिले आहे.  पाकिस्तानची सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाचा व्यापक आढावा घेण्याचे या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे, कारण पाकिस्तानात अंतर्गत कलह असून परदेशात पाकिस्तान एकाकी पडल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे, तर भारतासारख्या शेजारी देशाबरोबर संबंध दृढ करण्यावरही पक्षाने भर दिला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी व त्यांच्याशी संलग्न असलेले अवामी नॅशनल लीग आणि मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेण्ट या पक्षांसह इम्रान खान यांच्या तेहरिक – ए – इन्साफ पक्षानेही भारताशी उत्तम संबंध ठेवण्यावर भर दिला आहे.