नवी दिल्ली : दिल्लीसह भारतभर दंगली पसराव्यात यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारतातील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना ‘पाठिंबा’ देत आहेत, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केला.
पाकिस्तान भारतात जे ७० वर्षांत साध्य करू शकले नाही, ते त्यांचे ‘मित्र’ मोदी यांनी पाच वर्षांत घडवले. ते म्हणजे येथील बंधुभाव धोक्यात आणला, अशी टीका केजरीवाल यांनी ट्विटरवर केली आहे.
भाजपने ट्विटरवर म्हटले आहे की, देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) अमलबजावणी करण्यास पक्ष कटिबद्ध आहे. देशातून बौद्ध, हिंदू आणि शीखवगळता सर्व घुसखोरांना बाहेर काढले जाईल, असेही भाजपने या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी ही टीका केली आहे. पाकिस्तान आणि त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतात दंगली पेटलेल्या पाहायच्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तान हे निवडणुकीत मोदींना उघड पाठिंबा देत आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
मोदी यांचा विजय झाल्यास काश्मीरसारखे प्रश्न सोडविण्याची चांगली संधी असेल, असे मत इम्रान खान यांनी व्यक्त केले होते.