दहशतवादाला खतपाणी घालण्यावरुन पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. कारण, टेरर फंडिंगवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) एशिया पॅसिफिक ग्रुपच्या APG गटाने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर ओढवलेली ही मोठी नामुष्की आहे. आधीच कर्जाचा डोंगर असलेल्या पाकिस्तानवर ओढवलेली ही नामुष्की आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार एशिया पॅसिफिक अर्थात एपीजी गटाने पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट केले आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्यासंबंधीचे जे मापदंड आहे त्यातल्या ४० पैकी ३२ निकषांवर पाकिस्ताना अपयशी ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट म्हणजेच काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानला ग्रे यादीत टाकण्यात आले होते. ज्यानंतर पाकिस्तानने कृती आराखड्यानुसार काम करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यात पाकिस्तान सपशेल अपयशी ठरला. त्याचमुळे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. आता ऑक्टोबर २०१९ पर्यंत पाकिस्तानाला काळ्या यादीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हा मोठा झटका आहे. APGच्या निर्णयावर जर FATFने शिक्कामोर्तब केले तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला जाईल. जगातील इतर देश आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था पाकिस्तानला कर्ज देणे पूर्णतः थांबवतील. पाकिस्तानात गुंतवणूक केली जाणार नाही त्यामुळे त्यांच्या उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होईल. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या पाकिस्तानला देशांतर्गत परिस्थिती सांभाळणे कठीण होऊन बसले आहे.

APGची ही वार्षिक बैठक ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामध्ये पार पडली. या बैठकीत या संस्थेने टेरर फंडिंग रोखण्यासाठी पाकिस्तानच्या म्युच्युअल इव्हॅल्युएशन अहवालाचे परिक्षण केले. यावेळी पाकिस्तानने टेरर फंडिंग रोखण्यासाठी उचलत असलेल्या पावलांची येथे माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र, या युक्तीवादाने APGचे समाधान झाले नाही. APGने उचललेल्या या पावलांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ होणार असून त्यामुळे जगात हा स्पष्ट संदेश जाणार आहे की, टेरर फंडिंगमुळे पाकिस्तानकडून जगाला धोका आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan blacklisted by fatf apg failed on the effectiveness parameters aau
First published on: 23-08-2019 at 13:09 IST