नववर्षांच्या मध्यरात्री अरबी समुद्रात बुडालेल्या पाकिस्तानच्या जहाजावरील चार जण हे दहशतवादीच असल्याचा निर्वाळा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी देऊन त्या जहाजावरील चौघे तस्कर असल्याच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला. हे चौघे जण पाकिस्तानचे लष्कर आणि मेरिटाइम अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होते हे सूचित करणारा परिस्थितिजन्य पुरावाही उपलब्ध असल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
अरबी समुद्रात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री आणि नव्या वर्षांच्या पहाटे भारतीय तटरक्षक दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या सदर जहाजावर स्फोट होऊन ते समुद्रात बुडाले होते. त्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नांना पर्रिकर यांनी सोमवारी पूर्णविराम दिला.
या जहाजाला आग लावून त्यावरील चौघांनी त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचेच सूचित केले आहे. यावरून त्यांच्या आत्मघातकी कृत्याचा प्रत्यय येतो. जहाज अडविल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला यावरून ते दहशतवादी किंवा संशयित दहशतवादी असावे, असा निष्कर्ष निघतो, असेही संरक्षणमंत्री म्हणाले. हे चौघे पाकिस्तान लष्कर, मेरिटाइम अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंधितांच्या संपर्कात होते, असेही पर्रिकर म्हणाले.
आपण करीत असलेल्या दाव्याची सत्यता काय, असे विचारले असता पर्रिकर म्हणाले की, परिस्थितिजन्य पुराव्यांवरून आपल्या दाव्याला पुष्टी मिळत असल्याचे सूचित होते. मुंबईवर २००८ मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचा दावा करण्यात येत असल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर पर्रिकर यांनी वरील बाब स्पष्ट केली. या जहाजावरून तस्करी करण्यात येत असल्याचा दावाही केला जात आहे.

काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे – भाजप
पाकिस्तानच्या जहाजाच्या प्रश्नावरून काँग्रेस गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप सोमवारी भाजपने केला. काँग्रेस पक्षाचे नेते पाकिस्तानची भाषा वापरत असून त्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी समर्थन करीत आहेत का हे त्यांनी स्पष्ट  करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
देशावरील संभाव्य दहशतवादी हल्ला हाणून पाडण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी जी भूमिका पार पाडली त्याचे राहुल गांधी यांनी समर्थन केले पाहिजे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी या प्रकरणाबाबत सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे त्यामुळे राहुल गांधी मौन पाळून प्रवक्त्यांचे समर्थन करीत आहेत का, असा सवालही भाजपने केला. काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सुरक्षा यंत्रणांच्या नीतिधैर्याचे खच्चीकरण होत आहे.लोकसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेला पक्ष आता विरोधात असून आता हा पक्ष दहशतवादी हफीझ सईद याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानात निवडणुका लढविण्याच्या तयारीत आहे, असा हल्लाही भाजपने चढविला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे जहाज मच्छीमारी क्षेत्रात अथवा तस्करांकडून वापरण्यात येणाऱ्या मार्गावर नव्हते. त्या जहाजावरील चौघांच्या कृतीवरून त्यांचा कृष्णकृत्य करण्याचाच मनसुबा होता असे सूचित होते.  पाकिस्तान मेरिटाइम अधिकारी अथवा लष्कर यांच्याशी तस्कर संपर्क ठेवत नाहीत. उपग्रह दळणवळण साधनांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ते सतत पाकिस्तानी लष्कराच्या संपर्कात होते.
– मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्री