Pakistan : Jesus is supreme म्हणणाऱ्या ख्रिश्चन व्यक्तीस मृत्यूदंड!

“ख्रिश्चनांसाठी येशू ख्रिस्तच सर्वोच्च असतात”, असं म्हटल्याच्या प्रकरणात एका व्यक्तीला पाकिस्तानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Pakistan : Jesus is supreme म्हणणाऱ्या ख्रिश्चन व्यक्तीस मृत्यूदंड!

ईश्वरनिंदा केल्याच्या गुन्ह्याखाली पाकिस्तानमध्ये एका ख्रिश्चन व्यक्तीला थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशफाक मसीह असं या व्यक्तीचं नाव असून क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामध्ये इश्वरनिंदा केल्याचा आरोप त्याच्यावर होता. २८ वर्षीय अशफाक मसीहला २०१७मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीमध्ये मसीहला मृत्यूदंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

नेमकं काय घडलं?

जवळपास पाच वर्षांपूर्वी अर्थात २०१७मध्ये लाहोरमध्ये बाईक दुरुस्त करण्याचा व्यवसाय असणारा अशफाक मसीह याने एका व्यक्तीची बाईक दुरुस्त करून दिली. मात्र, आपण ईश्वराचे भक्त असल्याचं सांगत संबंधित व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. मात्र, आपण येशू ख्रिस्ताला मानतो, असं म्हणत अशफाक मसीह याने पूर्ण पैशांची मागणी केली. यातून त्या दोघांमध्येम मोठा वाद झाला. आजूबाजूला बरीच गर्दी जमली. प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप मसीहवर करण्यात आला. यावेळी मसीहने ख्रिश्चनांसाठी येशू ख्रिस्त सर्वोच्च असल्याचं विधान केल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला.

या प्रकारानंतर लाहोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मसीहला अटक केली आणि त्याच्याविरोधात ईश्वरानिंदेचा गुन्हा दाखल केला. त्याच्यावर गेल्या पाच वर्षांत खटला चालल्यानंतर अखेर त्याला या गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात बहावलपूरमधील न्यायालयाने वर्षभरापूर्वी ईश्वरनिंदेच्या गुन्ह्याखाली अटक केलेल्या हिंदू कुटुंबाची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ईश्वरनिंदेच्या अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानमधील न्यायालयांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात देखील एका २६ वर्षीय तरुणीला व्हॉट्सअॅप स्टेटसवर ईश्वरनिंदा करणारं छायाचित्र ठेवल्याच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मनमोहन सिंग यांच्या काळात गॅस ४५० रुपयांना होता; मोदीजी, आता १०५३ रुपयांचा सिलेंडर किती लोकांना परवडणार?”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी