पाकिस्तानी क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषक २०१९ मधून बाहेर पडल्यानंतर रविवारी सकाळी मायदेशात परतला. कर्णधार सरफराज अहमदसहीत सर्व खेळाडू इंग्लंडहून कराची विमानतळावर पोहचले. पाकिस्तानी संघ विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत पोहचण्यास अयशस्वी ठरला असला तरी अगदी उत्साहात पाकिस्तानी चाहत्यांने आपल्या लाडक्या खेळाडूंचे स्वागत केले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण संघाला कडेकोट बंदोबस्तामध्ये विमानतळाबाहेर काढण्यात आले. कोणत्याप्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून पूर्ण तयारी करण्यात आली होती.

खेळाडू विमानतळावर उतरल्यापासून त्यांच्याभोवती सुरक्षारक्षक होते. याच कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये आधी सर्वांना हॉटेलमध्ये आणि नंतर तेथून घरापर्यंत नेण्यात आले. भारताविरुद्ध तसेच इतर सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर ज्याप्रकारे सोशल नेटवर्किंगवर चाहत्यांनी राग व्यक्त केला होता त्यावरुन या खेळाडूंना विमातळावर रोषाला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘पाकिस्तान जिंदाबाद… सरफराज अहमद जिंदाबाद’चे नारेही पाकिस्तानी चाहत्यांनी खेळाडू विमातळावरुन बाहेर पडत असताना लावले. पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेमध्ये साखळी फेरीतील ९ पैकी ५ सामने जिंकले. मात्र सरासरी धावसंख्येच्या जोरावर ते अंतीम चार संघांमध्ये स्थान मिळवता आले नाही.

पाकिस्तानमध्ये पोहचल्यानंतर सरफराजने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने पहिला सामना गमवाल्यानंतर आम्हाला सरासरी धावसंख्येसंदर्भात माहिती मिळाल्याचे सांगितले. नंतर आम्ही सरासरी धावसंख्या सुधारण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला खेळपट्टीकडून अपेक्षित मदत मिळाली नाही त्यामुळेच मोठ्या फरकाने आम्हाला सामने जिंकता आले नाही असं सरफराज म्हणाला. ‘विश्वचषकातून बाहेर पडल्याचे संपूर्ण देशाला जितके दु:ख आहे तितकेच आम्हालाही आहे. कोणीही विश्वचषकासारख्या स्पर्धेत पराभूत होण्यासाठी जात नाही,’ असं सरफराज म्हणाला.

पाकिस्तानी संघाचा खेळ पाहिल्या पाच सामन्यांमध्ये चांगले झाले नाही अशी कबुली सरफराजने दिली. ‘पहिल्या सामन्यानंतर आम्हाला सूर गवसला मात्र पावसामुळे आम्हाला श्रीलंकेविरुद्ध खेळता आले नाही. ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्धचे सामने आम्ही हरलो. भारताविरुद्धाच्या पराभवानंतर पुढील सात दिवस आमच्यासाठी खूपच कठीण होते. या पराभवानंतर आम्ही दोन दिवस विश्रांती घेतली. त्यानंतर संघातील १५ खेळाडूंची बैठक घेतली. यामध्ये संघ व्यवस्थापनातील सहकाऱ्यांचा समावेश नव्हता. यामध्ये आम्ही संघाच्या खेळाशी संबंधित सर्व बारीकसारीक गोष्टींवर चर्चा केली. पहिल्या पाच सामन्यांमध्ये आम्ही अनेक चुका केल्याचे आम्हाला जाणवले. त्यानंतर उर्वरित चार सामन्यांमध्ये आम्ही चांगला खेळ केला. एक कर्णधार म्हणून मी संघाच्या खेळाबद्दल समाधानी आहे,’ असं सरफराजने या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. पाकिस्तानी संघामध्ये अनेक युवा खेळाडू असून ते नक्कीच संघाला एका नव्या उंचीवर नेतील असा विश्वासही सरफराजने व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

Cricket team captain Sarfaraz Ahmed returns from the United Kingdom to Karachi. #DawnToday #DawnViralToday

A post shared by Dawn Today (@dawn.today) on

शोएब मलिकला शेवटा सामना खेळता आला नाही याचे वाईट वाटले

विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर शोएब मलिकने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. ‘शोएब मलिकबद्दल बोलायचे झाले तर त्याला शेवटच्या सामन्यात संघात स्थान देता आले नाही. कारण आम्ही मागील सामन्यात जो संघ घेऊन विजय मिळवला होता तोच संघ खेळवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही नंतर त्याला आमच्या पद्धतीने निरोप दिला. आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत,’ असं सरफराज म्हणाला.