Pakistan’s Drone Strategy Exposed: जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळांना लक्ष केले. यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारतीय सीमेवर अनेक भागात हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. या पाकिस्तानच्या हल्ल्यांबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आङे.

पाकिस्तानकडून मोठ्या संख्येने हलक्या दर्जाचे आणि बेसिक ड्रोन्स भारतीय हवाई हद्दीत सोडण्यात आले, यामध्ये दडवून मोजकेच सर्व्हेलन्स आणि हल्ला करणारे ड्रोन्स पाठवण्यात आले. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला करत राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारतीय लष्करी तळांचा आढावा घेणे, गुप्त माहिती गोळा करणे, तसेच मर्यादीत हल्ले करणे आणि हवाई सुरक्षा यंत्रणेला गोंधळात टाकणे यासाठी पाकिस्तानने ही रणनीती अवलंबली होती, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

लष्करातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने लष्करी कारवाईला सुरूवात केल्यानंतर बारामुल्ला ते बारमेर या पश्चिमी आघाडीवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रोन्स पाठवण्यात आले. हे सत्र चार दिवस सलग चालू होते. दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये शस्त्रविरामावर सहमती झाल्यानंतर देखील दोन दिवस हा प्रकार सुरू होता.

दरम्यान ८ मे रोजी पाठवण्यात आलेल्या पहिल्या लाटेत खूप कमी प्रमाणात हत्यारबंद ड्रोन पाठवण्यात आले. दुसर्‍या रात्री पाठवण्यात आलेल्या लाटेत अशा ड्रोन्सची संख्या वाढलेली पाहायला मिळाली. अशा प्रकारच्या घुसखोरीच्या प्रत्येक लाटेत जवळपास ३०० ते ४०० ड्रोन्स पाठवण्यात आले होते, अशा माहिती सूत्रांनी दिली आहे.

नंतरच्या दोन रात्री ड्रोन्सची मर्यादीत प्रमाणात घुसखोरी पाहायला मिळाली. मात्र या सर्व प्रकरात पाकिस्तानने सहभाग नाकारला आहे. विशेषतः दोन्ही बाजूंकडून शस्त्रविरामावर सहमती झाल्यानंतर झालेल्या घुसखोरीची जबाबदारी पाकिस्तानने फेटाळली आहे.

“बहुतेक ड्रोन्स हे लहान होते आणि त्यांच्यावर कोणताही कॅमेरा किंवा इतर सर्व्हेलन्स यंत्र नव्हते. यांचा हेतू हा रडारांवर क्षमतेपेक्षा जास्त ताण टाकून त्यांना गोंधळात टाकणे, भारताच्या हवाई सुरक्षेच्या तैनातीबद्दलची गुप्त माहिती गोळा करणे आणि भविष्यात लाभ उठवण्यासाठी एअर डिफेन्स नेटवर्कमध्ये असलेल्या त्रुटी शोधून काढणे हा होता,” असे एका सूत्राने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

या हल्ल्यांचा आणखी एक उद्देश म्हणजे भारतीय दारूगोळा आणि क्षेपणास्त्रे वाया घालून संपवणे तसेच भारतीय हवाई संरक्षण प्रणालींचे लोकेशन रेकॉर्ड करणे आणि भारून टाकणे हा देखील होता. “ड्रोनचा वापर करण्यामागे कराराच्या कोणत्याही उल्लंघनाचे आरोप, विशेषतः शस्त्रविरामाच्या पार्श्वभूमीवर नाकारता येणे हा एक घटक देखील त्यामध्ये होता…कोणतेही सर्व्हेलन्स डिव्हाईस किंवा शस्त्रास्त्रांशिवाय पाठवलेल्या या ड्रोन्ससाठी हे अधिक वैध होते,” असे सूत्राने सांगितले. तसेच या ड्रोन्सच्या घुसखोरीमुळे भारतीय लष्कराचा मोठ्या प्रमाणात दारूगोळा खर्च झाला असेही त्यांनी सांगितले. “त्या काळामध्ये फक्त संख्येच्या (ड्रोन्सच्या) मदतीनेच सामान्य नागरिकांमध्ये भीती तयार झाली, असे सूत्राने सांगितले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या तळांची माहिती मिळवण्याकरिता सर्व्हेलन्स ड्रोन्स पाठवण्यासाठी LiDAR (लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग) तंत्रज्ञानाचा देखील वापर केला.

हे सर्व ड्रोन कुठून आले याबद्दल अद्याप स्पष्टता मिळालेली नाही, हल्ल्यासाठी पाकिस्तानने काही तुर्किये यूएव्हींचा वापर केला होता असे भारताने म्हटले आहे.

दरम्यान घुसखोरी केल्यानंतर ताबडतोब भारताने तैनात केलेल्या विविध हवाई संरक्षण प्लॅटफॉर्म आणि उपकरणांनी जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि एअर डिफेन्स गन्सचा वापर करून हे ड्रोन हाणून पाडले.

“जम्मू आणि काश्मीर येथे मोठ्या संख्येने हे ड्रोन्स लष्कराच्या रशियन बनावटीच्या एल/७० गन्सनी स्वदेशी दारुगोळा वापरून पाडले, आणि अशा प्रकारे इतर अत्याधुनिक आणि नवीन पिढीतील क्षेपणास्त्रे इतर कामांसाठी मागे ठेवण्यात आली,” असे दुसऱ्या एका सूत्राने सांगितले.

सशस्त्र दलांनी पाकिस्तानी हवाई तळांवर झालेल्या नुकसान आणि भारतीय एअर डिफेन्स सिस्टमने अडवून नष्ट केलेल्या विविध पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे यांचे व्हिडीओ स्वरूपातील पुरावे सादर केले आहेत .