India Pakistan News : भारतातल्या काश्मीर या ठिकाणी असेलल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर २२ एप्रिल रोजी गोळ्या झाडण्यात आल्या. आधी धर्म विचारला आणि त्यानंतर निष्पाप पर्यटकांना ठार करण्यात आलं. २६ भगिनींचं कुंकू पुसण्यात आलं. या घटनेचा जगाने निषेध नोंदवला. या दहशतवादी हल्ल्याच्या मागे पाकिस्तान आहे हे समजताच पाकिस्तानचा बदला घेतला पाहिजे अशी जनभावना होती. ज्यानंतर ६ आणि ७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि पाकिस्तानला करारा जवाब देण्यात आला. मागच्या तीन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर १० मे रोजी शस्त्रविराम देण्यात आला. यानंतर पाकिस्तानने हवाई हल्ला करताना कसा असंवेदनशीलपणा दाखवला? ऑपरेशन सिंदूर कसं घडलं याबाबत एअर मार्शल एके भारती यांनी माहिती दिली.
काय म्हणाले एके भारती?
भारतीय हवाई दलानं पाकिस्तानची लाहोरमधील रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली. यातून आम्हाला पाकिस्तानला इशारा द्यायचा होता की, भारतीय सैन्य तयार असले, तरी आम्हाला पाकिस्तानच्या सैन्याशी संघर्ष करायचा नाही, तर दहशतवाद्यांशी करायचा आहे. ८ मेच्या रात्री १० वाजून ३८ मिनिटांनी पाकिस्तानने श्रीनगरपासून नलियापर्यंत हल्ले केले. मात्र, भारतीय सुरक्ष दल पूर्ण तयार होतं. त्यामुळे त्यांना जे नुकसान करायचं होतं ते त्यांना करता आलं नाही. ७ मे रोजी युएव्ही हल्ले झाले, मात्र ८ मे रोजी युकेव्ह आणि युएव्हीची संख्या कमी होती आणि कॉटकॉप्टर्सची संख्या अधिक होती. याचा हेतू देखरेख ठेवणं किंवा नागरिकांना त्रास देणं असा असावा. पाकची ही आगळीक मध्यरात्रीपर्यंत चालली, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र हवाई हल्ला करताना पाकिस्तानने ते किती असंवेदनशील आहेत हे दाखवून दिलं.
पाकिस्तानचा असंवेदनशीलपणा दिसून आला-एके भारती
लाहोरजवळून भारतावर ड्रोन हल्ले करत असताना पाकिस्ताननं लाहोरहून नागरी विमानांचं उड्डाण सुरू ठेवलं. त्यांनी केवळ देशांतर्गतच उड्डाणं सुरू ठेवली नाही, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणंही सुरू ठेवली. ही गोष्ट फारच असंवेदनशील होती. लोकांच्या आयुष्याशी त्यांना काहीही घेणंदेणं नव्हतं. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे भारतीय हवाई दलाला खूप काळजीपूर्वक कारवाई करावी लागली. त्यामुळे भारतीय हवाई दलाला काही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आम्ही कोणत्याही नागरी विमानाला नुकसान होऊ दिलं नाही, असं भारती यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तानचे ३५ ते ४० जवान ठार झाल्याचीही दिली माहिती
भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलाने आज पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी एअर मार्शल एके भारती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, दोन्ही देशांमधील सघर्षादरम्यान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यातील ३५-४० जवान मारले गेल्याचीही माहिती दिली.