PM Modi Slams Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील एका कार्यक्रमात पाकिस्तानवर संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला आहे आणि बदला घेण्याचे त्यांचे वचन पूर्ण केल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी यावेळी यावर भर दिला की, ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे गुन्हेगार देखील मारले गेले आहेत. याचबरोबर त्यांनी पाकिस्तानसह काँग्रेस आणि समाजवादी पक्षावरही टीका केली.
पाकिस्तान, काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पाकिस्तान अस्वस्थ आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण काँग्रेस आणि समाजवादी पक्ष पाकिस्तानच्या वेदना सहन करू शकत नाहीत. तिकडे पाकिस्तान रडत आहे आणि इथे काँग्रेस व समाजवादी पक्ष दहशतवाद्यांची अवस्था पाहून रडत आहेत. काँग्रेस सतत आपल्या सैन्याच्या शौर्याचा अपमान करत आहे. काँग्रेसने ऑपरेशन सिंदूरला ‘तमाशा’ म्हटले आहे.”
समाजवादी पक्षावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “वोटबँक आणि तुष्टीकरणाच्या या राजकारणात समाजवादी पक्षही मागे नाही. त्यांचे नेते प्रश्न विचारत होते की, या विशिष्ट दिवशीच पहलगाम दहशतवादी का मारले गेले? कोणतीही कारवाई करण्यापूर्वी मी त्यांना फोन करून विचारायचे का? सामान्य ज्ञान असलेल्या कोणालाही उत्तर देता येईल की, दहशतवाद्यांना मारण्यासाठी आपण वाट पाहण्याची गरज आहे का? आपण त्यांना पळून जाण्याची संधी दिली पाहिजे होती का? हे तेच लोक आहेत, जे सत्तेत असताना दहशतवाद्यांना क्लीन चिट देत असत आणि आता दहशतवादी मारले गेल्यावर ते नाराज होत आहेत. त्यांना ‘सिंदूर’ या ऑपरेशनच्या नावाची समस्या आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मी ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच काशीला आलो आहे. जेव्हा २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा २६ निष्पाप लोक इतक्या क्रूरपणे मारले गेले होते. माझे हृदय वेदनेने भरले होते. तेव्हा मी बाबा विश्वनाथांना प्रार्थना करत होतो की, त्यांनी सर्व पीडित कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची हिंमत द्यावी. माझ्या मुलींच्या सिंदूरचा बदला घेण्याचे मी जे वचन दिले होते ते देखील पूर्ण झाले आहे. हे केवळ महादेवाच्या आशीर्वादाने शक्य झाले आहे.”