पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयने गुजरातवर २६/११ सारखा हल्ला घडवण्याचा कट रचल्याची माहिती भारतातील गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार पोरबंदरमधील मच्छिमारांच्या चार बोट मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. चारही बोट पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ पोहोचल्या होत्या. यादरम्यान पाकिस्तानच्या तटरक्षक दलाच्या सैनिकांनी भारतीय मच्छिमारांकडील ओळखपत्र आणि बोटीवरील यूआयडी घेऊन पळ काढला.

भारतीय मच्छिमारांकडील यूआयडी आणि ओळखपत्रांचा पाकिस्तानकडून वापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यूआयडी आणि ओळखपत्राचा वापर करुन दहशतवादी भारतात प्रवेश करु शकतात. यापूर्वीही पाकिस्तानने भारतीय मच्छिमारांच्या बोट, उपकरणे जप्त केली आहेत. मात्र यावेळी फक्त यूआयडी आणि ओळखपत्र जप्त करण्यात आली, मच्छिमार आणि त्यांच्या बोटींना सोडण्यात आले. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पोरबंदरमधील घटनेनंतर भारतातील गुप्तचर यंत्रणांनी नौदल आणि तटरक्षक दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईप्रमाणे गुजरातमध्ये २६/११ सारखा हल्ला होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिग्गज मंडळी गुजरातच्या मैदानात प्रचारासाठी उतरली आहेत. त्यामुळे गुजरात पाकच्या रडारवर असल्याचे सांगितले जाते.