भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (आयएसआय) प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी, मॉड्यूलच्या वेगवेगळ्या संशयितांना आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित लोकांना वेगवेगळी कामे दिली गेली होती. या दहशतवाद्यांची चौकशी सुरू असून आणखी काही धागेदोरे मिळतात का, हे तपासलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या दहशतवाद्यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे. लेफ्टनंट गाझीने ग्वादर बंदरात या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ हे सांभाळत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या कामात गाझीचे दोन शिष्य होते, ज्यांची नावे जब्बार आणि हमजा आहेत. पोलिसांनी पाकिस्तानच्या आयएसआय प्रशिक्षित दहशतवादी मॉड्यूलच्या सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे.

जीशान कमर आणि ओसामा या दोन आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे की, त्यांना समुद्र मार्गाने पाकिस्तानात नेण्यात आले. वाटेत त्यांनी अनेक बोटी बदलल्या समुद्र प्रवासानंतर ते पाकिस्तानातील ग्वादर बंदराजवळ जिओनीला पोहोचले. तेथे त्यांचे एका पाकिस्तानीने स्वागत केले जो त्यांना पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थट्टा भागात एका फार्महाऊसवर घेऊन गेला. फार्महाऊसमध्ये तीन पाकिस्तानी नागरिक होते. त्यातील दोन जब्बार आणि हमजा यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. हे दोघेही पाकिस्तानी सैन्यातील होते कारण ते लष्करी गणवेश घातला होते. हमजा सामान्य नागरिकांसारखे कपडे घालत होता, पण प्रशिक्षणादरम्यान सर्व त्याचा आदर करत होते.

दहशतवादी जीशान कमर आणि ओसामा यांना बॉम्ब आणि आईईडी बनवण्याचे आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या सहाय्याने स्पोट करण्याचे प्रशिक्षण दिले होते. तसेच अनेक प्रकारच्या बंदुका आणि एके-४७ हाताळण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते.

महाराष्ट्रातील जान मोहम्मद शेख (४७), दिल्लीतील जामियानगरचा ओसामा (२२) उर्फ ​​सामी, उत्तर प्रदेशातील रायबरेलीचा मूलचंद उर्फ ​​लाला (४७) आणि बहराइच, उत्तर प्रदेशचा मोहम्मद अबू बकर (२३) या दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या सर्वांना १४ दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे. इतर दोन आरोपी जीशान कमर आणि मोहम्मद अमीर जावेद यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली येथे छापे टाकले आणि एकूण ६ जणांना अटक केली. या संशयित दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan isi trained terror module busted operatives trained lieutenant rank officer gwador port srk
First published on: 15-09-2021 at 13:23 IST