Operation Baam By BLF: बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट या बंडखोर संघटनेने मंगळवारी रात्री उशिरा बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी संस्था आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून हल्ले केले. गेल्या काही वर्षांत त्यांनी केलेल्या सर्वात व्यापक हल्ल्यांपैकी हा हल्ला होता.
बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट या संघटनेने “ऑपरेशन बाम” नावाच्या मोहिमेची जबाबदारी स्वीकारली असून, पाकिस्तानविरुद्ध दशकांपासून सुरू असलेल्या लढाईत एक नवीन अध्याय सुरू करण्याची शपथ घेतली आहे, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने बलुचिस्तानच्या पंजगुर, सुराब, केच आणि खारानमध्ये किमान १७ हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रशासकीय पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. याचबरोबर त्यांनी पाकिस्तानी लष्करी चौक्यांवरही हल्ले केले आहेत.
या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले, याबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु स्थानिक सूत्रांनी या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त दिले आहे.
एका निवेदनात, बीएलएफचे प्रवक्ते मेजर ग्वाहराम बलोच यांनी या मोहिमेचे वर्णन “बलुच राष्ट्रीय मुक्ती युद्धातील एक नवीन पहाट” असे केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही कारवाई मकरान किनाऱ्यापासून कोह-ए-सुलेमान पर्वतांपर्यंत होती.
“आमच्या प्रतिकाराने आता एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. ऑपरेशन बाम, बलुच सैनिक मोठ्या भागांतही मोठ्या प्रमाणात, समन्वयित ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहेत, हे दाखवण्यासाठी राबवण्यात आले आहे”, असे मेजर ग्वाहराम म्हणाले.
मेजर ग्वाहराम यांनी असा दावा केला की, सुरक्षा दलांचे “मानवी आणि भौतिक नुकसान” करण्यासाठी हे हल्ले काळजीपूर्वक करण्यात आले होते. दरम्यान, या हल्ल्यांचे प्रमाण आणि अचूकतेमुळे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बंडखोरी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते.
बुधवारी सकाळपर्यंत, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी हल्ले झालेल्या जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम सुरू केली होती, तर केच आणि पंजगुरच्या काही भागांमध्ये संपर्क सेवा बंद करण्यात आल्या होत्या. बीएलएफने सांगितले की, ते ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर याबाबतची अधिक माहिती जाहीर करतील.