पाकिस्तानच्या ‘टूलकिट प्रयोगा’वर केंद्राची भूमिका
पाकिस्तानने शनिवारी ‘काश्मीर ऐक्य दिवस’ साजरा केला असतानाच, काश्मीरच्या मुद्दय़ावर जगभरातून पाठिंबा मिळवण्यासाठी टूलकिट्स तयार करणाऱ्या आमच्या ‘शत्रुराष्ट्राच्या’ अशा ‘नव्या प्रयोगांमुळे’ भारताला घाबरवले जाऊ शकत नाही, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
भारत व पाकिस्तान यांच्यात काही प्रलंबित मुद्दा असेलच, तर तो आमच्या शेजारी देशाच्या अवैध ताब्यात असलेला जम्मू- काश्मीरचा भाग आहे, असेही सिंह म्हणाले.
‘पाकिस्तानने काश्मीर ऐक्य दिवस पाळल्यामुळे अस्वस्थ होण्यासारखे काहीही नाही. कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यास आम्ही पुरेसे सज्ज आहोत’, असे पंतप्रधान कायार्लयात राज्यमंत्री असलेले सिंह येथील भाजप मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. १९९० पासून दरवर्षी ५ फेब्रुवारीला पाकिस्तान साजरा करत असलेला ‘काश्मीर ऐक्य दिवस’ आणि आपल्या काश्मीर धोरणाला पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तानने या वर्षी जगभरातील निरनिराळय़ा दूतावासांना पाठवलेल्या कथित ‘टूलकिट’ याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
‘१९४७ सालच्या फाळणीच्या मध्यरात्रीपासून, जम्मू व काश्मीर हा भारताचा भाग असल्याची बाब पाकिस्तान स्वीकारू शकलेला नाही व त्यामुळे ते त्यांच्याकडील सर्व क्लृप्तय़ांचा वापर करत आहेत. त्यांनी ३ युद्धे केली आणि आता घुसखोरी करत आहेत’, असे सिंह म्हणाले.
१९९४ साली भाजप सत्तेवर नसताना देशाच्या संसदेने एकमताने एक ठराव संमत केला. ‘भारत व पाकिस्तान यांच्यात काही प्रलंबित मुद्दा असेलच, तर तो ७५ वर्षांनंतरही पाकिस्तानच्या अवैध ताब्यात असलेला जम्मू- काश्मीरचा भाग परत मिळवणे हा आहे’, असे या ठरावात म्हटले आहे, याची सिंह यांनी आठवण करून दिली.