पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इम्रान खान यांनी ट्विटरवरुन या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतासह जगभरात होळी साजरी करण्यात येत असून पाकिस्तानमध्ये होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. इस्लामाबादसह विविध शहरांमधील बाजारपेठा रंगांनी रंगून गेल्या आहेत. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी ट्विटरवरुन पाकमधील हिंदूंना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर बिलावल भूट्टो – झरदारी यांनी देखील होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीनिमित्त आपण शांततेचा प्रसार करुया, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी हिंदू कौन्सिलने यंदा पाकिस्तानी सैन्याला होळीद्वारे पाकिस्तानी सैन्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये सुमारे ३६ लाखांहून अधिक हिंदू नागरिक आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील एका मंत्र्याने हिंदूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याची इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळामधून हकालपट्टी करण्यात आली होती. फय्याज अल हसन चौहान असे या मंत्र्याचे नाव होते. फय्याज हे पंजाब प्रांतामधील सरकारमध्ये माहिती आणि सांस्कृतिक मंत्री होते.