पक्षपाती आणि शहानिशा न केलेल्या माहितीवर आधारित अहवाल असल्याची भारताची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात भारतावर ताशेरे ओढणाऱ्या काश्मीरबाबतच्या संयुक्त राष्ट्र अहवालाचा संदर्भ दिल्यानंतर भारताने त्याच्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, तो अहवाल मानवी हक्क मंडळाच्या प्रतिनिधींनी विचारात घेण्याच्याही दर्जाचा नाही असे म्हटले आहे. पाकिस्तानने काल पुन्हा काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही आठवडय़ांत पाकिस्तानने तिसऱ्यांदा हा प्रयत्न केला असून त्याला वेळोवेळी भारताने चपराक दिली आहे.

पाकिस्तानने काल केलेल्या प्रयत्नाचा समाचार घेताना भारताने म्हटले आहे, की पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा गैरवापर करीत आहे. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांत चर्चा करण्याचा प्रयत्न हा गैर आहे.  पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी १४ जूनच्या काश्मीर व पाकव्याप्त काश्मीरबाबतच्या संयुक्त राष्ट्र मानवी हक्क उच्चायुक्तांनी दिलेल्या अहवालाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मानवी हक्क आयुक्त झैद राद अल हुसेन यांनी सादर केलेला अहवाल केंद्रस्थानी घेऊन पाकिस्तानने सुरक्षा मंडळात बालके व सशस्त्र संघर्ष यात त्यातील संदर्भ घुसडण्याचा प्रयत्न केला.

त्यावर भारताचे उप स्थायी प्रतिनिधी तन्मय लाल यांनी पाकिस्तानवर चौफेर टीका करताना सांगितले, की जम्मू काश्मीरमधील स्थितीबाबतचा तो कथित अहवाल हा पक्षपाती असून कुठलीही शहानिशा न केलेल्या माहितीवर तो आधारित आहे. या अहवालाची मानवी हक्क मंडळाच्या सदस्यांनी दखल घेण्याच्या दर्जाचाही तो नाही. झैद राद यांचा हा मानवी हक्क अहवाल भारताने आधीच फेटाळला आहे. काश्मीरमधील परिस्थितीची मानवी हक्क मंडळाच्या मार्फत स्वतंत्र, आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची गरज आहे असे त्या अहवालात म्हटले आहे.

पाकिस्तानने वेळोवेळी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे चर्चेचील महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहतात. पाकिस्तान त्याच्या हितासाठी असे प्रयत्न करीत असून, त्यामुळे तो देश पसरवत असलेल्या दहशतवादाचा मुद्दा लपणारा नाही. पाकिस्तानने काश्मीर प्रश्न यापूर्वीही उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असून ते यशस्वी झाले नाहीत, आताही होणार नाहीत असे लाल यांनी सांगितले.

तिसऱ्यांदा प्रयत्न

गेल्या काही आठवडय़ांत पाकिस्तानने लागोपाठ तिसऱ्यादा काश्मीरचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. २५ जून रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर गेल्या आठवडय़ात व चालू आठवडय़ात हा प्रश्न पाकिस्तानने उपस्थित केला. प्रत्येक वेळी भारताने त्याला चोख उत्तर दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan raise kashmir issues in united nations
First published on: 11-07-2018 at 02:03 IST