वॉशिंग्टन : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारत अशा रीतीने प्रत्युत्तर देईल, की त्याचे रूपांतर व्यापक प्रादेशिक समस्येत होणार नाही, अशी आशा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी व्यक्त केली. पाकिस्तानच्या भूमीवरून काही वेळा आगळीक करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास पाकिस्तान भारताला सहकार्य करील, अशी अपेक्षा असल्याचेही व्हान्स यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जे. डी. व्हान्स यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातीत ताणले गेलेले संबंध यांवर भाष्य केले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांबाबत काळजी वाटत असल्याचे व्हान्स म्हणाले. अमेरिका भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संपर्कात आहे. आम्हाला आशा आहे की भारत या दहशतवादी हल्ल्याला अशा प्रकारे उत्तर देईल की ज्यामुळे व्यापक संघर्ष निर्माण होणार नाही.

भारताशी लवकरच अमेरिकेचा व्यापार करार

व्यापार करारासंदर्भात भारताबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती जे. डी. व्हान्स यांनी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आयात कराबाबत चर्चा करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कणखर मुत्सद्दी असल्याचे सांगत व्हान्स यांनी वाटाघाटीबाबत संतुलन साधणार असल्याचे स्पष्ट केले.

सुरक्षा परिषदेची लवकरात लवकर बैठक व्हावी

न्यूयॉर्क: भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव निवळण्यासाठी प्रत्येक देशांना आपापली मते या ठिकाणी मांडता येतील. ग्रीसचे ‘यूएन’मधील कायमस्वरुपी प्रतिनिधी आणि सुरक्षा परिषदेचे मे महिन्यातील अध्यक्ष इव्हॅन्जिलॉस सेकेरिस यांनी हे मत व्यक्त केले. अशा बैठकीची विनंती आली, तर ती व्हायला हवी, लवकरात लवकर व्हायला हवी, असे ते म्हणाले.

द्रुतगती महामार्गावर हवाई दलाचे लँड अँड गो

शाहजहाँपूर: हवाई दलाने शुक्रवारी ‘लँड अँड गो’ हा सराव उत्तर प्रदेशातील गंगा द्रुतगती महामार्गावरील साडेतीन किलोमीटरच्या पट्ट्यात केला. देशाच्या संरक्षणसिद्धतेत यामुळे महत्त्वाचा टप्पा आपण गाठला आहे. या महामार्गावर दिवसा व रात्री लढाऊ विमाने उतरण्याची क्षमता यामुळे निर्माण झाली आहे. देशातील अशी ही पहिली हवाई धावपट्टी असणार आहे. लढाऊ विमानांना आणीबाणीच्या वेळी उतरण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे. यापूर्वी लखनौ-आग्रा महामार्गावर आणि पूर्वांचल द्रुतगती महामार्गावर अशी सुविधा उपलब्ध आहे. पण, त्या ठिकाणी फक्त दिवसाच विमानांना उतरता किंवा उड्डाण करता येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानकडून सीमेवर सलग आठव्या दिवशी गोळीबार

जम्मू/श्रीनगर: नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने शस्त्रसंधी कराराचे पुन्हा उल्लंघन करून गोळीबार केला. सलग आठव्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारताच्या लष्कराने त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. सीमावर्ती भागातील नागरिकांनी वैयक्तिक संरक्षणासाठी बांधलेल्या बंकरमध्ये जाण्यास सुरुवात केली आहे. कुपवाडा, बारामुल्ला, पूँछ, नौशेरा, अखनूर या भागात छोट्या तोफांचा मारा पाकिस्तानने केला.