भारताचा संयुक्त राष्ट्रसंघात आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वानी याचा गुणगौव केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताने पाकिस्तानला ‘दहशतवादी राष्ट्र’ संबोधित करून, हा देश दहशतवादाचा देशाच्या धोरणाचे आयुध म्हणून ‘युद्ध गुन्हे’ करत असल्याचा जोरदार हल्ला चढवला आहे.

ज्या देशाचा कारभार सरकारमार्फत नव्हे, तर ‘वॉर मशीनद्वारे’ चालतो, असा पाकिस्तान हातात बंदूक ठेवून चर्चा करू इच्छितो असा जबर शाब्दिक मार देऊन, कुठल्याही पूर्वअटींशिवाय ‘गंभीर व कायमस्वरूपी’ द्विपक्षीय संवाद साधण्याचे शरीफ यांचे आवाहनही भारताने तीव्र शब्दांत नाकारले आहे. नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोर केलेले भाषण ‘धमकीने भरलेले आणि वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणारे’ असल्याची तीव्र प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी नोंदवली.  त्यांनी जागतिक व्यासपीठावर वानीचे उदात्तीकरण करणे म्हणजे पाकिस्तानने स्वत:वरच दोषारोपण करणे असल्याचे ते म्हणाले. एका देशाचा नेता संयुक्त राष्ट्रसंघासारख्या व्यासपीठावर ‘एका स्वयंघोषित व स्वत:ची जाहिरात करणाऱ्या दहशतवाद्याचे’ उदात्तीकरण करतो हे ‘धक्कादायक’ असल्याचे मत अकबर यांनी व्यक्त केले. बुऱ्हान वानी हा हिज्बुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर होता. ही संघटना जगभरात दहशतवादी गट म्हणून ओळखली जाते, असे भारतीय पत्रकारांशी वार्तालापात शरीफ यांच्या आमसभेतील भाषणाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले. पाकिस्तानी पंतप्रधानांनी असे वक्तव्य करून स्वत:वरच दोष ओढवून घेतला आहे. त्यांचे धमकीयुक्त व बढाईखोर भाषण आम्ही ऐकले. ‘अत्यंत अपरिपक्व आणि वस्तुस्थितीचा अपलाप करणारे’ असे त्याचे वर्णन करता येऊ शकते, असे अकबर म्हणाले.

पाकला सडकून प्रत्युत्तर

काश्मिरातील परिस्थितीबाबत शरीफ यांनी केलेल्या दीर्घ अशा निंदाव्यंजक भाषणाला उत्तर देण्याचा अधिकार वापरताना संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कायम राजदूत ईनम गंभीर यांनी या भाषणाला सडकून प्रत्युत्तर दिले. मानवाधिकारांचे सर्वात वाईट उल्लंघन म्हणजे दहशतवाद होय आणि त्याचा वापर सरकारच्या धोरणाचे आयुध म्हणून केला जात असेल, तर तो युद्ध गुन्हा होय, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. माझ्या देशाला तसेच इतर शेजारी राष्ट्रांना आज जे काही सोसावे लागतेय ते पाकिस्तानची दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे दीर्घकाळापासूनचे धोरण असून, त्याचे परिणाम या क्षेत्राबाहेरही पसरले आहेत, असे गंभीर म्हणाल्या. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय मदतीतून वळते केलेल्या अब्जावधी डॉलर्सचा वापर दहशतवादी गटांना प्रशिक्षण, आर्थिक मदत व पाठिंबा देण्यासाठी करणारे पाकिस्तान हे ‘दहशतवादी राष्ट्र’ आहे, असे गंभीर यांनी सुनावले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan state sponsor of terrorism
First published on: 23-09-2016 at 01:37 IST