वृत्तसंस्था, अमृतसर
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्णमंदिराला लक्ष्य केले होते, अशी माहिती लष्कराने सोमवारी दिली. मात्र, या हल्ल्यांची शक्यता विचारात घेऊन मंदिराला आधीच हवाई संरक्षण दिल्यामुळे पाकिस्तानचे सर्व ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करण्यात यश आल्याचे लष्कराने स्पष्ट केले.
लष्कराने अमृतसरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना माहिती देताना पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या आणि भारताच्या लष्कराने नष्ट केलेल्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे अवशेष दाखवले. त्यामध्ये कामाकाझी ड्रोन आणि तुर्की बनावटीच्या मायक्रो-ड्रोनच्या अवशेषांचा समावेश आहे. तसेच पाकिस्तानचे हल्ले परतवण्यासाठी अद्यातनित एल-७० हवाई संरक्षण तोफा आणि आकाश क्षेपणास्त्रांसह प्रगत यंत्रणांचा कसा वापर करण्यात आला त्याची माहिती देण्यात आली.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत ७ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने काही तासांतच अमृतसरसह पंजाबमधील अन्य शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते प्रयत्न हाणून पाडण्यात आले. त्याबद्दल माहिती देताना ‘१५ इन्फन्ट्री डिव्हिजन’चे प्रमुख मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी सांगितले की, ‘‘पाकिस्तानच्या लष्कराकडे कोणतेही वैध लक्ष्य नाही हे माहीत असल्यामुळे ते लष्करी आस्थापने व धार्मिक स्थळांसह नागरिकांना लक्ष्य करतील असा आमचा अंदाज होता. त्यापैकी सुवर्णमंदिर सर्वात प्रमुख होते. सुवर्णमंदिराभोवती व्यापक हवाई संरक्षण छत्र उभारण्यासाठी आम्ही अतिरिक्त आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केल्या.’’
दरम्यान, कोणताही लष्करी कमांडर किंवा जनरल दरबार साहिबांवर हल्ला करण्याचा विचार करू शकत नाही अशी माझी श्रद्धा आहे, अशी प्रतिक्रिया शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सचिव कुलवंत सिंग मान यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानने प्रामुख्याने ड्रोन आणि लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे, या मानवरहित हवाई शस्त्रांनी मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले चढवले. आम्हाला याचा अंदाज असल्यामुळे आम्ही संपूर्ण तयारीत होतो आणि आमच्या सतर्क तोफांनी सुवर्ण मंदिराच्या दिशेने सोडण्यात आलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली.– मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री, प्रमुख, ‘१५ इन्फन्ट्री डिव्हिजन’