जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यापासून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानने आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय. दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, भारताविरोधात युद्धाची सुरूवात पाकिस्तान कधीही करणार नाही असं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“युद्धाची सुरूवात आम्ही कधीही करणार नाही. पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न आहेत. दोन्ही देशांमधील तणावाचा संपूर्ण जगाला धोका आहे.मी भारताला सांगू इच्छितो की, युद्ध कोणत्याही समस्येवर उपाय ठरु शकत नाही. युद्धात जिंकणाऱ्या देशालाही खूप काही गमवावं लागतं आणि अखेरीस तोही पराभूत ठरतो. युद्धामुळे अनेक नव्या समस्यांचा जन्म होतो”, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. सोमवारी(दि.3) लाहोरमध्ये शीख समुदायांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदींसोबत यापूर्वी झालेल्या फोनवरीच चर्चेचाही मुद्दा खान यांनी यावेळी मांडला. भारताशी चर्चेसाठी अनेकदा प्रयत्न करुनही काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच, “मी जेव्हा जेव्हा भारताशी चर्चेचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा भारताने स्वतः सुपरपावर असल्याचा आव आणला, आणि तुम्ही असं करा किंवा तसं करा अशाप्रकारचे आदेश उलट आम्हालाच दिले”, असं खान म्हणाले.

बालाकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील चर्चा बंद होती, त्यानंतर आता कलम 370 हटवल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan will never ever start war with india says imran khan sas
First published on: 03-09-2019 at 10:17 IST