Operation Sindoor India-Pakistan conflict news : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यादरम्यान दोन्ही देशांकडून काल रात्री आणि शनिवारी सकाळी एकमेकांच्या लष्करी तळांवर अनेक हल्ले करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने रविवारी (११ मे) पाकिस्तानी वेळेनुसार दुपारी १२ वाजेपर्यंत (दुपारी १२:३० आयएसटी) सर्व हवाई वाहतुकीसाठी त्यांचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. दरम्यान हवाई वाहतूक पूर्णपणे बंद केल्याने पाकिस्तानची हवाई क्षेत्र पूर्णपणे ओसाड पडल्याचे फ्लाइट ट्रॅकिंग डेटामधून दिसून आले आहे.

पाकिस्तानने सुरुवातीला त्यांचे हवाई क्षेत्र हे सर्व प्रकारच्या विमानांसाठी शनिवारी पहाटे ३.१५ वाजेपासून दुपारी १२ पर्यंत (पाकिस्तानी वेळ) बंद असेल असे नोटीस टू एअरमेन (NOTAM) मध्ये जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरी NOTAM जारी करत हवाई क्षेत्र रविवारी दुपारपर्यंत बंद ठेवण्यात येईल अशी घोषणा केली. शुक्रवारी उशीरा भारताने उत्तर आणि पश्चिमेकडील ३२ विमानतळे नागरी विमानांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात निर्णय जाहीर केला. हे विमानतळ १५ मे सकाळी ५.२९ मिनिटांपर्यंत बंद असणार आहेत. नागरी विमान वाहतूक अधिकार्‍यांनी जारी केलेल्या NOTAMs मध्ये याबाद्दल माहिती देण्यात आली.

भारताने बुधवारी पाकिस्तानतील ९ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’ अतर्गत हल्ला केल्यानंतर सरकारने भारत आणि पाकिस्तान सीमेच्या जवळ असलेले किंवा प्रमुख भारतीय हवाई दलाच्या तळांवर असलेले २५ विमानतळ शनिवारी सकाळी ५.२९ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरून सामान्य नागरिकांना संभाव्य हानीपासून दूर ठेवता येईल. पण दोन देशांमधील तणाव आणखी वाढला असून पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले जात आहेत. तसेच भारतीय लष्कराकडून या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे, ज्यामुळे बंद ठेवण्यात आलेल्या विमानतळांच्या संख्येत भर पडली असून ते बंद ठेवण्याचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे.

असे असले तरी पाकिस्तानने मात्र त्यांचे हवाई क्षेत्र किंवा विमानतळ नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी बंद केले नव्हते. यानंतर शुक्रवारी आणि शनिवारी भारताने पाकिस्तानवर दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू असताना त्यांच्या नागरी विमानांना ढाल म्हणून वापरल्याचा आरोप केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण भारताने पाकिस्तानातील सहा ठिकाणी लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्र नागरी विमानांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या यापूर्वीच पाकिस्तानी हवाई क्षेत्राचा वापर करणे टाळताना दिसत आहेत.