Pakistani Spy Arrested : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात काहींना अटक करण्यात आल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर एनआयएने कारवाई करत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दिल्लीतून एका जवानाला अटक केलं होतं. त्यानंतर आणखी एक घटना समोर आली होती, राजस्थानमधून एका सरकारी कर्मचाऱ्याला हेरगिरी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलं होतं. यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना भारतीय सिम कार्ड पुरवल्याच्या आरोपाप्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव हसीन (४२) असं आहे. तो राजस्थानमधील डीग जिल्ह्यातील रहिवासी आहे. हा आरोपी कासिमचा मोठा भाऊ असून त्याला दोन दिवसांपूर्वी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेला आरोपी मोहम्मद हसीन हा मोहम्मद कासिम (वय ३४) याचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला हेरगिरी आणि भारतीय सिम कार्ड पाकिस्तानला पाठवण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून कथित हेरगिरी नेटवर्कचा भाग असलेल्या आणखी काहींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वृत्तानुसार, “ऑगस्ट २०२४ मध्ये हसीनने कासिममार्फत काही भारतीय सिम कार्ड पाकिस्तानला पाठवल्याचा संशय आहे. त्यापैकी एक सिम कार्ड त्याच्या नावावर होतं आणि तेच सिम कार्ड पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा वापरत होतं, असा संशय आहे. याबाबत हसीनने खुलासा केला की तो भारतीय लष्करी आस्थापनांचे फोटो पाठवत होता आणि त्या बदल्यात पैसे घेत होता. तसेच त्यांनी पाकिस्तानमध्ये व्हॉट्सअॅप सक्रिय करण्यासाठी ओटीपी देखील दिला होता”, विशेष कक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, हसीनला न्यायालयात हजर करण्यात आलं असून या हेरगिरीच्या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याच्या चौकशीसाठी आणि तपासासाठी त्याची कोठडी मागण्यात आली आहे. तसेच हसीन आणि कासिमकडून जप्त करण्यता आलेले मोबाईल फोन डिलीट केलेला डेटा परत मिळवण्यासाठी दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचंही वृत्तात म्हटलं आहे.