Bihar Voter List : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यातच राज्यात स्पेशल इंटेंसिव रिवीजन SIR ची प्रक्रिया सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. भागलपूर जिल्ह्यात पाकिस्तानी महिलेचं नाव बिहारच्या मतदार यादीत आलं आहे. या महिलेचं नाव फक्त मतदार यादीत नाही तर हे नाव SIR च्या प्रक्रियेतूनही व्हेरीफायही झालं आहे. या बाबत बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

भागलपूरमध्ये तीन पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य

गृह मंत्रालयाच्या टीमने व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान भागलपूरमध्ये तीन पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. यातील दोन महिला होत्या. गृह मंत्रालयाचा रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलीस मुख्यालयाने एसएसपीकडे या प्रकरणाचा तपास सोपवला. यानंतर सखोल तपास केल्यानंतर या पाकिस्तानी महिलांचे मतदान ओळखपत्र देखील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

१९ जानेवारी १९५६ ला भारतात आली आहे ही महिला

रंगपूर या ठिकाणी राहणारी ही पाकिस्तानी महिला १९ जानेवारी १९५६ मध्ये भारतात आली. तिचं नाव फिरदौसिया खानम असं आहे. दुसरी महिला इमराना खानम उर्फ इमराना खातून सुद्धा तीन वर्षांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. या दोघींव्यतिरिक्त आणखी एक पाकिस्तानी नागरिक 24 मे २००२ मध्ये दोन वर्षांचा व्हिसा घेऊन भारतात आला होता. या व्यक्तीने सुद्धा भारतातील आधारकार्ड तयार करून घेतले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

बिहारच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित

तिन्ही पाकिस्तानी नागरिक अनेक वर्षांपासून भारतात राहत होते. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही त्यांनी येथेच राहणे पसंत केले. आता घुसखोर नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना तत्काळ पाकिस्तानात पाठवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या लोकांनी येथे राहून मतदान ओळखपत्र, आधारकार्ड कसे तयार केले? भारतीय नागरिक नसताना त्यांच्याकडे भारतातील कागदपत्रं कुठून आली? त्यांना कुणी मदत केली? यात स्थानिक नागरिकांचीही मदत झाली का? असेही प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.