पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी २००२ मध्ये भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची तयारी केली होती असा धक्कादायक खुलासा जपानमधील वृत्तपत्राने केला आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करायचा की नाही या विचारांमुळे मुशर्रफ यांना रात्री झोपदेखील लागत नव्हती असे या वृत्तात म्हटले आहे.

जपानमधील ‘मेनिची शिनबून’ या वृत्तपत्राला परवेझ मुशर्रफ यांनी मुलाखत दिली असून यात त्यांनी भारतावर अण्वस्त्र हल्ल्याची तयारी केली होती असा गौप्यस्फोट केला. २००१ मध्ये भारताच्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. २००२ मध्ये या तणावाने टोक गाठले होते. भारताविरोधात अण्वस्त्रांचा वापर करायचा की नाही, सीमेवर अण्वस्त्र न्यायचे का, असा प्रश्न मी रोज स्वतःला विचारायचो, या विचाराने मला रात्रभर झोपदेखील यायची नाही, असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. भारताकडून अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता असल्याने मी अण्वस्त्रांचा वापर न करण्याचा निर्णय घेतला, असे मुशर्रफ यांनी सांगितले. भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी दोन दिवस लागणार होते. दोन्ही देशांकडे अण्वस्त्र वाहून नेणारे मिसाईल सज्ज नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताविरोधात अण्वस्त्रांचा वापर करणार होता की नाही, या प्रश्नाला मुशर्रफ यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले नाही.

परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार बरखास्त करुन सत्तेवर ताबा मिळवला. यानंतर २००१ ते २००८ या कालावधीत ते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षभरापासून ते दुबईत असून पाकमध्ये जाण्यासाठी त्यांना वैद्यकीय व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. २००७ मध्ये बेनझिर भुट्टो यांच्या हत्येचा आरोपही मुशर्रफ यांच्यावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.