ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी कोटय़वधी डॉलर्सची गुंतवणूक परदेशात केली असल्याचे पॅराडाईज पेपर्समध्ये दिसून आले आहे. दी इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टस व दी इंडियन एक्स्प्रेस यांनी या कागदपत्रांच्या आधारे परदेशातील गुंतवणुकींचा शोध घेतला होता, त्यात बम्र्युडा येथील विधी आस्थापनेची कागदपत्रे तपासून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. राजघराण्याने परदेशात केलेली गुंतवणूक पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या मालमत्ता व्यवस्थापकांनी केला आहे. पॅराडाईज पेपर्समध्ये उघड झालेल्या नावात ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नाव आले आहे. परदेशात गुंतवणूक सेवा पुरवणाऱ्या दोन सेवा पुरवठादार आस्थापने व एक कंपनी यांच्या १३.४ दशलक्ष कागदपत्रातून ही नावे उघड झाली आहेत. डय़ुशी ऑफ लँकस्टर या मालमत्ता व्यवस्थापकांनी २००५ मध्ये डोव्हर स्ट्रीट ६ तेमन फंड एलपी यात ७५ लाख डॉलर्सची गुंतवणूक केली होती. या कंपन्यांतील नफा नंतर मोबाईल फिंगर प्रिंट तंत्रज्ञान व औषध निर्मिती कंपन्यांत वापरण्यात आला. ब्रिटिश व अमेरिकी विद्यापीठे, संयुक्त अरब अमिरात बँक, धर्मादाय संघटना यांचीही गुंतवणूक यात आहे. जून २००८ मध्ये ब्रिटनच्या राणीला या गुंतवणुकीतून ३ लाख ६० हजार डॉलर्स मिळाले. परदेशातील अ‍ॅपलबाय कंपनीच्या कागदपत्रातून ही माहिती उघड झाली आहे. ब्राइटहाऊस या खासगी समभाग कंपनीतही दी केमन फंडची गुंतवणूक असून ब्राइटहाऊस कंपनी भाडय़ाने घ्या व मालक व्हा या तत्त्वावर घरांचे व्यवहार करते पण या कंपनीने ब्रिटनमधील वंचितांसाठी असलेली घरे अशा पद्धतीने विक्रीस काढली आहेत. यात वार्षिक व्याज दर ९९.९ टक्के इतका आकारला आहे.  २००४ ते २०१० या काळात डय़ुशी ऑफ लँकस्टर यांनी बम्र्युडा येथील ज्युबिली अ‍ॅबसोल्यूट रिटर्न फंडातही गुंतवणूक केली. डय़ुशी या मालमत्ता व्यवस्थापकांनी राणीच्या वार्षिक आर्थिक विवरणपत्रात या गुंतवणुकीची नोंद केलेली नाही. खासगी उत्पन्न जाहीर करण्याचे बंधन राणीवर नाही कारण त्या स्वेच्छेने कर भरत असतात. डय़ुशी ऑफ  लँकस्टर यांनी सध्या केमन आयलंड फंडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या प्रवक्त्याने दी गार्डियनला सांगितले की, राणीसाहेब स्वेच्छेने गुंतवणुकीतील उत्पन्नावर कर भरतात. त्यांची आणखी दोन परदेशी निधीतही गुंतवणूक आहे. आमची गुंतवणूक ही कर धोरणावर आधारित नसते तर गुंतवणूक सल्लागारांच्या शिफारशींवर आधारित असते. आमच्या अनेक ठिकाणी गुंतवणुका आहेत त्यात काही परदेशी निधी आहेत. त्या सर्व गुंतवणुकांचे लेखापरीक्षण केले असून ते कायदेशीर आहेत. डय़ुशीने म्हटले आहे की, ब्राइटहाऊसमध्ये ३२०८ पौंड गुंतवणूक आहे पण त्याचा गुंतवणूक निधीशी काही संबंध नाही. आम्ही अतिशय नामांकित अशा खासगी समभाग निधीत गुंतवणूक केलेली आहे. मजूर पक्षाच्या खासदार मार्गारेट होग या सार्वजनिक लेखा समितीच्या माजी अध्यक्षा असून त्यांनी राणीच्या गुंतवणूक सल्लागारांवर परखड टीका केली आहे.

‘पॅराडाइज पेपर्स’मध्ये पाकचे माजी पंतप्रधान शौकत अझीझही

इस्लामाबाद : परदेशातील गुंतवणुकीबाबत उघड झालेल्या कागदपत्रांमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शौकत अझीझ यांचेही नाव आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी पनामा पेपर्समध्ये नवाझ शरीफ यांचे नाव भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात आल्यामुळे त्यांना पंतप्रधानपद गमवावे लागले होते. ६८ वर्षांचे अझीझ २००४ ते २००७ या कालावधीत पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी होते. आयसीआयजेसह ९५ माध्यम भागीदारांनी उघड केलेल्या कागदपत्रांमध्ये किमान ३१ हजार व्यक्ती किंवा पक्ष यांच्याबाबतची माहिती आहे. अझीझ यांचा त्यांनीच स्थापन केलेल्या ‘अंटाक्र्टिक ट्रस्ट’शी संबंध असून, त्यात त्यांची पत्नी, मुले व नात यांचा लाभार्थी म्हणून समावेश असल्याचे वृत्त ‘दि एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने दिले आहे. अझीझ यांनी १९९९ साली अर्थमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी अमेरिकेच्या डेलावेअर राज्यात हा ट्रस्ट स्थापन केला होता. त्या वेळी ते सिटीबँकेसाठी काम करत होते. अर्थमंत्री असताना किंवा नंतर पंतप्रधान झाल्यानंतर केव्हाही त्यांनी या ट्रस्टची माहिती जाहीर केली नव्हती. अझीझ यांच्यावर मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचा, भ्रष्टाचार आणि निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप असल्याचे लॉ फर्मच्या अनुपालन अधिकाऱ्याने २०१२ साली अंतर्गत पत्रव्यवहारात नमूद केले होते. तीन वर्षांनंतर, पाकिस्तानच्या एका न्यायालयाने प्रख्यात बलुच नेते अकबर बुगती यांच्या खुनाच्या संदर्भात अझीझ यांच्याविरुद्ध तीन अटक वॉरंट जारी केल्याची बाब अ‍ॅपल बाय या लॉ फर्मने सर्वाधिक धोका असलेल्या ग्राहकांच्या डेटाबेसमध्ये नमूद केले होते.