जगातील सर्वाधिक चर्चेमधील मायक्रोब्लॉगींग वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटर कंपनीमध्ये सोमवारी मोठा खांदेपालट झाला. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजेच डॉर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा कंपनीने केल्यानंतर भारतीयांनी आणखीन एका मोठ्या कंपनीच्या प्रमुखपदावर भारतीय व्यक्ती विराजमान होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. याचदरम्यान महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी अगदी खास शैलीमध्ये या घटनेची सांगड सध्या सुरु असणाऱ्या करोना साथीशी घालत भारतीय सीईओंबद्दल ट्विट केलंय.

गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडॉब, आयबीएम, पालो अॅल्टो नेटवर्क आणि आता ट्विटरचे सीईओ सुद्धा भारतीय आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात भारतीयांचे हे यश कमालीचं आहे. यामधून अमेरिका विस्थापितांना किती संधी देते हे दिसून येतं, असं एक ट्विट पॅट्रीक कोलीसन यांनी केलं होतं. आनंद महिंद्रांनी हे ट्विट कोट करुन रिट्विट केलं आहे. “ही एक अशी जगभरामध्ये पसरलेली साथ आहे ज्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. हा इंडियन सिईओ व्हायरस आहे. यावर कोणतीही लस नाहीय,” असं महिंद्रा म्हणालेत.

ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११ पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्वीट केले. जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.