Parents of astronaut Shubhanshu Shukla Video : भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज (२५ जून) दुपारी १२.०१ वाजता इतिहास रचला आहे. शुभांशू शुक्ला यांनी नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. नासाचं फॉल्कन-९ हे यान अवकाशात झेपावलं, यावेळी शुक्ला यांच्या कुटुंबाने ते लखनौ येथील त्यांच्या घरातून पाहिले. यावेळी त्याचे कुटुंबिय चांगलेच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय वायू दलाचे अधिकारी असलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडीलांसाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. यावेळी त्यांच्या आई आशा सुक्ला यांना आनंदाश्रू आवरण कठीण झालं. त्यांनी मुलाला अंतराळात झेपावताना पाहिलं. “सर्वजण आनंदी आहेत. हे आनंदाश्रू आहेत,” अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

त्यांचे वडील शंभू दयाल शुक्ला यांनी देखील, “आम्ही आनंदी आहोत” अशा मोजक्याच शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळातील प्रवासासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांबरोबर त्यांचे मित्र, शेजारी आणि त्यांच्या जवळचे लोक देखील जमले होते.

‘ॲक्सिऑम-४’ मोहिम

‘ॲक्सिऑम-४’ मोहिमेअंतर्गत शुक्ला यांच्याबरोब इतर तीन अंतराळविरांनी देखील आज अवकाशात उड्डाण केलं. फॉल्कन-९ या रॉकेटद्वारे त्यांनी अवकाशात उड्डाण केले. याआधी ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहीमेवर गेले होते. ४१ वर्षांनंतर एक भारतीय अंतराळवीर आज अवकाशात झेपावला आहे. शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनौचे रहिवासी असून ते वायूदलात ग्रुप कॅप्टन या पदावर कार्यरत आहेत. १ वर्षाचं प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर त्यांची नासाने या मोहीमेसाठी निवड केली आहे.

शुक्ला हे या मोहिमेचे सारथ्य करत असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ते १५ दिवस राहणार आहे. या काळात ते शून्य गुरुत्वाकर्षणात काही प्रयोग करणार आहेत. नासा (NASA) व इस्रो (ISRO – भारतीय अंतराळ संशोधन संशा) या दोन दिग्गज अंतराळ संशोधन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे.