scorecardresearch

‘अदानी’वरून संसदेत वादंग, मोदींमुळे अदानींचा साम्राज्यविस्तार

राहुल गांधींचा आरोप पुरावे द्या, अन्यथा माफी मागा : भाजप

dv rahul gandhi

नवी दिल्ली : उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नाते काय, असा थेट प्रश्न करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत हल्लाबोल केला. यावर भाजपच्या सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून राहुल गांधींनी पुरावे द्यावेत अन्यथा पंतप्रधानांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. 

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मोदी-अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असून दोघेही एकमेकांना फायदा करून देतात. अदानींनी २० वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले, असा प्रश्न गांधी यांनी विचारला. मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन येतात आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक कंत्राटे अदानींच्या कंपन्यांना मिळतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशातील उद्योगजगत त्यांच्या विरोधात होते. त्या काळात अदानी मोदींच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा त्यांचे नाते स्थानिक होते, मग गुजरातव्यापी झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे नाते राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहे, असे गांधी म्हणाले. 

विमानतळ विकसित करण्यासाठी पूर्वानुभव असलेल्या कंपन्यांनाच कंत्राट देण्याची अट अदानींसाठी बदलण्यात आली आणि देशातील सहा विमानतळे अदानींकडे सुपूर्द केली गेली. मुंबईचे विमानतळाचे कंत्राट असलेल्या ‘जीव्हीके’ कंपनीविरोधात ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’चा ससेमिरा लावून विमानतळ अदानीच्या ताब्यात देण्यासाठी दबाव आणला गेला, असे अनेक गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले.

‘भारत जोडो’ यात्रेत आपण देशभर फिरलो, मला फक्त लोकांकडून अदानी हे एकच नाव ऐकू येत होते. बेरोजगारी, महागाईबद्दल तरुण बोलतात; पण राष्ट्रपतींच्या अभिभाषणात या मुद्दय़ांचा उल्लेखही नाही. ‘अग्निवीर’ योजनेबद्दल तरुणामध्ये अत्यंत नाराजी आहे. बेरोजगार तरुणांच्या हाती शस्त्रे देऊन हिंसा वाढेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, केंद्रीय गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी ही योजना लष्करावर लादल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधींनी मोदींवर थेट आरोप केल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, प्रल्हाद जोशी, अर्जुन मेघवाल तसेच भाजप खासदार रविशंकर प्रसाद, निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींनी पुरावे देऊन आरोप करावेत किंवा मोदींची माफी मागावी, अशी मागणी केली.

राहुल गांधींचे प्रश्न

  • गेल्या आठ वर्षांमध्ये अदानी समूहाची भरभराट कशी झाली?
  • मोदी-अदानी परदेश दौऱ्यावर एकत्र किती वेळा गेले?
  • मोदींचा दौरा झाल्यानंतर तात्काळ अदानींनी किती परदेश दौरे केले?
  • मोदींच्या परदेश दौऱ्यानंतर अदानींना किती वेळा कंत्राट मिळाले?
  • कंत्राट मिळाल्यावर अदानींनी किती वेळा परदेश दौरा केला?
  • अदानींनी २० वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले?

विरोधकांच्या रणनीतीत बदल

अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेने अदानी समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर, विरोधकांनी या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती किंवा निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी मागणी केली होती. संसदेमध्ये यावर चर्चा व्हावी, अशीही मागणी होत होती. या मागण्यांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे विरोधकांनी रणनीती बदलली. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विरोधी बाकांवरून प्रथम बोलताना राहुल गांधींनी अदानी व मोदींवर हल्लाबोल केला.

राहुल गांधी यांनी निराधार, निर्लज्ज आणि बेपर्वा आरोप केले आहेत. काँग्रेस आणि त्यांचे नेतेच देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या मोठय़ा घोटाळय़ांमध्ये सहभागी आहेत. नॅशनल हेरॉल्ड, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळय़ांची राहुल गांधींना आठवण करून देण्याची वेळ आली आहे. राहुल गांधी, मातोश्री सोनिया गांधी आणि त्यांचे जावई रॉबर्ट वडेरा हेच सध्या जामिनावर आहेत.

– रविशंकर प्रसाद, खासदार, भाजप

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 00:03 IST