Parliament Monsoon Session 2025 : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तराबाबत आज संसदेत चर्चा पार पडली आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात चर्चा पार पडत असताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरवरून आणि भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांना आज (२९ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या धमक्यांबाबतही मोदींनी स्पष्टीकरण दिलं. तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला कोणत्या देशांनी पाठिंबा दिला होता, याचीही माहिती त्यांनी सांगितली.

तसेच भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी कशी झाली? कोणाचा फोन आला होता? याचाही खुलासा मोदींनी केला आहे. कारण ऑपरेशन सिंदूर डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगावं असं आव्हान राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात दिलं होतं. त्यावर जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा असं आपल्याला सांगितलेलं नाही असं मोदी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही स्पष्ट केलं नाही की डोनाल्ड ट्रम्प हे खोटे बोलत आहेत. तसेच मोदींच्या संपूर्ण भाषणात चीनबाबत एक शब्दही निघाला नसल्याचं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

खासदार राहुल गांधी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात कुठेही स्पष्टपणे सांगितलं नाही की डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत. डोनाल्ड ट्रम्प २९ वेळा भारत-पाकिस्तानच्या शस्त्रसंधीबाबत बोललेत. मात्र, तरीही मोदींनी त्यावर काहीही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान मोदींनी संपूर्ण भाषणात एकदाही चीनचा उल्लेख केला नाही. हे संपूर्ण देशाला माहिती आहे की पाकिस्तानची टेक्निकली एअर फोर्सची मदत चीनने केली. मात्र, तरीही पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्र्यांच्या तोंडून यावर एकही शब्द निघाला नाही”, असं खासदार राहुल गांधींनी म्हटलं.

भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी कशी झाली? मोदींचा खुलासा

“जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितलं नाही. मला ९ मे रोजी रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांचा फोन आला होता. एका तासांहून अधिकवेळ ते फोन करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यावेळी माझी सैन्यांबरोबर मीटिंग सुरू होती. त्यानंतर एका तासांनी मी पुन्हा त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की तुमचा दोन ते तीन वेळा फोन आला आहे, बोला. तेव्हा मला उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनी सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे. असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा माझं त्यांना उत्तर होतं की, जर पाकिस्तानचा हा हेतू असेल तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, हे पाकिस्तानला महागात पडेल. जर पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही मोठा हल्ला करून प्रत्युत्तर देऊ”, असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांना मी सांगितलं होतं, असं मोदी यांनी म्हटलं.

ऑपरेशन सिंदूर थांबविण्यासाठी पाकिस्ताननं गयावया केली

भारताने जागतिक नेत्यांच्या सांगण्यावरून शस्त्रविराम करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपाला उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाकिस्तानकडून शस्त्रविराम करण्यासाठी गयावया करण्यात आली. पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्या विधानाचा हवाला देताना पंतप्रधान मोदींनी म्हटले, “तुम्ही खूप मारले. आता आणखी मार खाण्याची आमच्यात ताकद नाही. बस करा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑपरेशन सिंदूर थांबवा असं एकाही देशाने सांगितलं नाही : मोदी

जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा हे सांगितलं नाही, ९ मे च्या रात्री अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण मी फोन उचलू शकलो नाही. त्यानंतर एक तासाने मी संपर्क केला ते म्हणाले पाकिस्तान तुमच्यावर मोठा हल्ला करणार आहे. मी त्यांना उत्तर दिलं, जर पाकिस्तानचा हा इरादा असेल तर तो त्यांना महागात पडेल. जर पाकिस्तानने हल्ला केला तर त्यापेक्षा मोठा हल्ला करुन आम्ही उत्तर देऊ हे मी त्यांना सांगितलं. गोळीचं उत्तर आम्ही तोफगोळ्याने देऊ असं मी त्यांना सांगितलं. मी आज लोकशाहीच्या मंदिरात पुन्हा सांगतो ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. पाकिस्तानने कुठलीही आगळिक केली तर त्यांना करारा जवाब मिळेलच असंही मोदी म्हणाले.