विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नावर सरकार चर्चा करण्यास तयार असून येत्या संसदीय अधिवेशनात तेलंगणाचा मुद्दा निकाली निघण्याची आशा पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली. संसदीय अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी लोकसभा अध्यक्षा मीराकुमारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तेलंगणाचा प्रश्न महत्वाचा असून येत्या अधिवेशनात तेलंगणा विधेयक मंजूरीसाठी संसदेपुढे सादर करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून तेलंगणाचा प्रश्न प्रलंबित असून, येत्या अधिवेशनात सभागृहाच्या सदस्यांनी कामकाजात सुज्ञपणा दाखवल्यास तेलंगणा विधेयक मंजूर होण्याचा आशावाद यावेळी मनमोहनसिंगांनी व्यक्त केला. अधिवेशन म्हणजे खासदारांना त्यांच्या समस्या संसदेपुढे मांडण्याची सुवर्णसंधी आहे. तसेच विधिमंडळाचे कामकाज शांतपणे पार पाडणे ही संसदीय लोकशाहीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ आणि विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे १२ दिवस चालणारे संसदीय अधिवेशन कितपत शांतपणे पार पडेल याबद्दल साशंकता आहे.