गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सध्या देशात नसले तरी ते लवकरच भारतात परततील. ते आपली जबाबदारी पेलण्यास सक्षम आहेत पक्ष त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे नेतृत्व बदलाचा प्रश्नच येत नाही, असे गोव्यातील भाजपा नेते राजेंद्र अर्लेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पर्रिकर सध्या वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत गेले आहेत.

काँग्रेसने पर्रिकर तसेच इतर दोन मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे मंत्रीमंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या या मागणीच्या अनुषंगाने पत्रकारांनी अर्लेकर यांना नेतृत्व बदलाबाबत प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना ते म्हणाले, पर्रिकर पक्ष आणि पक्षाच्या आमदारांच्या मदतीने ही परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहेत. तसेच पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे नेतृत्व बदलाचा प्रश्नच येत नाही.

दरम्यान, वैद्यकीय उपचारांसाठी भाजपाचे दोन आमदार पांडुरंग मडकैकर आणि फ्रान्सिस डसुझा हे देखील सध्या रुग्णालयात आहेत. मडकैकर यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने ते ५ जूनपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर डिसुझा हे अमेरिकेत उपचार घेत आहेत. या दोघांच्या जागी विरोधी पक्षातील दोन आमदार भाजपात येणार असून ते संख्याबळ राखतील अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चा खोटी असल्याचे अर्लेकर यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे पर्रिकर ज्यावेळी परततील त्यावेळी ते पक्षाशी सल्ला मसलत करुन हा प्रश्न सोडवतील आणि अंतिम निर्णय घेतील. पक्षाने पर्रिकरांना या प्रकरणी निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे अर्लेकर यांनी सांगितले. ३१ ऑगस्ट रोजी पर्रिकर पुन्हा उपचारांसाठी अमेरिकेत गेले आहेत. ८ सप्टेंबर रोजी ते पुन्हा भारतात परततील. या वर्षांच्या सुरुवातीला ते स्वादुपिंडाच्या आजारावर उपचारांसाठी तीन महिन्यांच्या मोठ्या कालावधीसाठी अमेरिकेत उपाचर घेत होते.