अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदीक औषधांनी करोनावर उपचार करण्याच्या विवादानंतर हरियाणा सरकारने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये करोना रुग्णांमध्ये पतंजलीच्या एक लाख कोरोनिल किटचे वाटप करण्यात येणार आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री अनिल विज यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

“हरियाणातील करोना रूग्णांमध्ये एक लाख पतंजली कोरोनिल किटचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. कोरोनिलचा निम्मा खर्च पतंजली व निम्मा हरियाणा सरकारच्या कोविड रिलीफ फंडातून केला जाणार आहे,” असे विज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हरियाणा सरकारने अ‍ॅलोपॅथीबाबत रामदेवबाबा यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला असताना हा निर्णय घेतला आहे. आयएमएनं योगगुरु रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी योगगुरु रामदेवबाबा यांना पत्र लिहून वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. दरम्यान, अ‍ॅलोपॅथीच्या विधानावरून योगगुरू रामदेव यांनी आपली चूक कबूल केली.

योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने करोना सात दिवसांत पूर्णपणे बरा करणारे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केल्यानंतर आयुष मंत्रालयाने तातडीने जारी केलेल्या आदेशाद्वारे ‘पतंजली’ला या औषधाची जाहिरात करण्यास मनाई केली होती. ‘आयुष’ने ‘पतंजली’कडे या औषधातील घटकांचा तपशील मागवला होता. यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या औषधावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, ‘पतंजली’चे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, “आम्ही वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिल गोळ्यांना कधीही वैद्यकीय रित्या आणि कायदेशीररित्या करोनाचं औषध म्हटलं नाही,” असं म्हटलं होतं.

यापूर्वी ‘पतंजली’ने ‘कोरोनिल’ या नावाचा वापर केल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायायलयाने कंपनीला १० लाखांचा दंड केला आहे. तसेच कंपनीने या शब्दाचा वापर बंद करण्याचा आदेशही कंपनीला दिला होता.

रविवारी हरियाणामध्ये कोरोनाचे ४४०० नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर राज्यात एकूण करोना बाधितांची संख्या ७३८,०२८ झाली आहे. गेल्या २४ तासांत ९७  लोकांनी प्राण गमावले, त्यानंतर करोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ७,५१२ वर गेली. गेल्या २४  तासांत ९,४८० लोकांनी करोनावर मात केली आहे.