Patanjali Ayurved Misleading Ads Case : पतंजलीच्या उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी पतंजलीवर मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयात काही महिन्यांपासून सुरु होता. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना मोठा दिलासा दिला आहे. पतंजलीवरील मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला आहे. हा निर्णय न्यायमूर्ती हिमा कोहली आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दिला आहे.

पतंजलीने उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मागील काही महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. या सुनावणीवेळी बाबा रामदेव आणि पतंजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण हे देखील अनेकदा सर्वोच्च न्यायालयात हजर राहिले होते. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना अनेकदा फटकारलं होतं. तसेच या प्रकरणात बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी न्यायालयात माफीही मागितली होती.

हेही वाचा : Supreme Court : “आदेशाकडे दुर्लक्ष का केलं जातं?”, सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारलं

सर्वोच्च न्यायालयाने दिली तंबी

दरम्यान, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी पतंजलीवर मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला. मात्र, यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना तंबी देखील दिली. “जर न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाले तर कठोर शिक्षा होईल.”, असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातीच्या प्रकरणासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १७ ऑगस्ट २०२२ पासून सुनावणी सुरु होती. या याचिकेमध्ये पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी काही आजार बरे होत असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच पतंजलीला या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यात आल्या पाहिजेत, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयात अनेकवेळा सुनावणी पार पडली होती. तसेच या प्रकरणात बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी दोनवेळा माफीही मागितली होती. यानंतर अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना दिलासा देत पतंजलीवरील मानहानीचा खटला बंद केला आहे.